Baramati By Election Result 2026 : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी 9 व्या फेरीनंतर 78 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. निकालादरम्यान त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.
Baramati By Election Result 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू असून, सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत.
9 व्या फेरीनंतर प्रचंड आघाडी
नवव्या फेरीच्या मतमोजणीनंतर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 78 हजार 528 मतांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी सतत वाढत असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. बारामतीत एकूण 22 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत एकतर्फी होताना दिसत आहे.
सुनेत्रा पवारांची भावनिक प्रतिक्रिया
निकालादरम्यान सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हा विजय दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना समर्पित केल्याचे म्हटले. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत कोणताही जल्लोष, मिरवणुका किंवा गुलाल टाळण्याची विनंती केली.
‘नव्या बारामती’चा निर्धार
सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानत, “हा शेवट नाही, ही नव्या संघर्षाची आणि नव्या बारामतीची सुरुवात आहे,” असेही आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अजित पवारांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अजित पवारांचा विक्रम धोक्यात?
बारामतीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत अजित पवार यांच्या नावावर आहे. 2019 मध्ये त्यांनी 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजय मिळवला होता. यंदा हा विक्रम मोडण्यासाठी 1 लाख 65 हजार 266 मतांचा टप्पा पार करावा लागणार आहे. एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


