Ashok Kharat Case : अशोक खरातच्या मोबाईलची क्लोन कॉपी फॉरेन्सिक तपासात मिळाल्यानंतर कोडवर्ड्स आणि संशयास्पद संपर्क उघड झाले आहेत. या आधारे न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.

Ashok Kharat Case : दैवी शक्ती, तंत्र-मंत्र आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. फॉरेन्सिक तपासातून त्याच्या मोबाईलची ‘क्लोन कॉपी’ मिळाल्यानंतर कोडवर्ड्सद्वारे संवाद साधून गुन्हे केल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे तपास अधिक गतीमान झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोडवर्ड्स आणि संशयास्पद संपर्कांचा उलगडा

सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाने न्यायालयात सांगितले की, खरातने आपल्या मोबाईलमध्ये अनेक क्रमांक विशिष्ट कोडवर्ड्स आणि सांकेतिक नावांनी सेव्ह केले होते. या कोडेड मेसेजेसद्वारे तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. डिजिटल पुराव्यांच्या सखोल विश्लेषणासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचेही एसआयटीने स्पष्ट केले.

न्यायालयाचा निर्णय: कोठडीत वाढ

रविवारी (२९ मार्च) नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी आणि बचाव पक्षात युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अशोक खरातच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले. या सुनावणीत पीडितेच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली.

अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवली?

भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. म्हणून लागणारा अधिकचा वेळ. तसेच अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे. त्याची समक्ष चौकशी करायची आहे. याशिवाय महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ते खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत त्यांचे डोके जड व्हायचे. यानंतर अशोक खरात सांगायचा तसे या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे? याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही, त्याचा तपास करायचा आहे.

अशोक खरातने भोंदूगिरी करत किती आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली? याचा तपास करायचा आहे.अशोक खरात याने जे कृत्य केले त्यात त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे. तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरातला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गुन्ह्यांची संख्या वाढतेच; १० प्रकरणे नोंद

एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, खरातविरुद्ध आतापर्यंत अत्याचाराचे आठ आणि खंडणी व फसवणुकीचे दोन असे एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. तपासादरम्यान आणखी पुरावे समोर येत असून, पुढील काही दिवस तो पोलिस कोठडीतच राहण्याची शक्यता आहे.