सार

Ashadhi Wari Palkhi Ceremony : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत.

Ashadhi Wari Palkhi Ceremony : 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात अन् भक्तिमय अशा आनंदमय वातावरणात देहूनगरी न्हाहून निघाली आहे. वारकरी, नागरिक असा लाखोंचा मेळा इंद्रायणी काठी अवतरला आहे. नागरिक इंद्रायणीत स्नान करून तुकोबांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागलेत. देहूत दिंड्याही मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल

श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९ वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकायांच्यावतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथेच वारकरी पूजाअर्चा व भजन करीत आहेत. त्यामुळे सध्या देहूत भक्तीमय वातावरण आहे.

यंदाही निर्मल वारीचा संकल्प

संस्थान आणि नगरपंचायत यांच्यावतीने यंदाही निर्मल वारीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी स्वच्छतेच्या अनुषंगाने पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंद्रायणी नदीघाट, देऊळवाडा या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. गावात ठिकठिकाणी एक हजारांहून अधिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असून भाविकांसाठी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आणखी वाचा :

Ashadhi Wari Palkhi Ceremony : माऊलींचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान, अलंकापुरीत वारकऱ्यांनी मांदियाळी