Ambarnath : अंबरनाथ येथे ६६ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असून, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ही रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी वापरली गेल्याचं सांगितलं जातेय. 

Ambarnath : अंबरनाथ येथील ६६ वर्षीय मीना सूर्यवंशी यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र पुढील उपचारासाठी हलवण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप

सूर्यवंशी यांचे नातेवाईकांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही. कारण ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी वापरली जात होती. या कारणामुळे रुग्णाला वेळेवर हलवता न आल्याने तिचा मृत्यू झाला, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णालयाचा आरोप फेटाळला

या प्रकरणावर छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “मीना सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र १५ मिनिटांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, हा आरोप तथ्यहीन आहे.”

नाट्यमंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम

दरम्यान, अंबरनाथ पश्चिम भागातील सर्कस मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे लोकार्पण रविवारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जसे की अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव आणि इतर कलाकार उपस्थित होते.