- Home
- Maharashtra
- Alandi Yatra 2025: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! संजीवन समाधी सोहळ्यासाठी धावणार एसटीच्या जादा बसेस, जाणून घ्या
Alandi Yatra 2025: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! संजीवन समाधी सोहळ्यासाठी धावणार एसटीच्या जादा बसेस, जाणून घ्या
Alandi Yatra 2025: कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, पुणे विभागीय एसटी महामंडळाने 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आळंदीसाठी विशेष बससेवा जाहीर केली आहे.

संजीवन समाधी सोहळ्यासाठी एसटीच्या जादा बससेवा
पुणे: कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. भाविकांना प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विभागीय एसटी महामंडळाने 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विशेष बससेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
मुख्य सोहळा 15 नोव्हेंबर रोजी होणार असून, 17 नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, “वाहतुकीतील अडचणी टाळण्यासाठी एसटीच्या सुरक्षित आणि सोयीस्कर सेवांचा लाभ घ्यावा.”
भाविकांसाठी एसटीची खास व्यवस्था
दरवर्षीप्रमाणे यंदाही आळंदीत भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने चार ठिकाणी तात्पुरती बसस्थानके उभारली आहेत. या ठिकाणांहून भाविकांच्या गरजेनुसार नियमित फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे वारकऱ्यांना आळंदीपर्यंत आणि परतीच्या प्रवासात सहज सुविधा मिळणार आहेत. एसटी प्रशासनाने खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
अतिरिक्त बससेवांची यादी
आळंदी मुख्य बसस्थानकावरून
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, रायगड, ठाणे, पालघर
आळंदी–चाकण मार्गावरून
राजगुरुनगर, नारायणगाव, संगमनेर, नाशिक, मुरबाड, कल्याण, कोपरगाव, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे
आळंदी–वडगाव घेणंद मार्गावरून
शिक्रापूर, शिरूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नांदेड, बीड, परभणी, नागपूर, जळगाव
डुडुळगाव चौकीवरून
आळंदी–देहू मार्गावरील फेऱ्या सुटणार आहेत.
पंढरपूरसाठीही विशेष एसटी व्यवस्था
दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यासाठी पुणे विभागाकडून 100 जादा एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. याशिवाय, 40 प्रवाशांचा गट असल्यास त्यांच्या सोयीसाठी "घरपोच एसटी सेवा" देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही भाविकांसाठी मोठी दिलासादायक सुविधा ठरणार आहे.
भाविकांसाठी संदेश
वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी, वाहतुकीचा त्रास आणि खर्च वाचवण्यासाठी एसटीच्या जादा बससेवांचा लाभ घ्यावा.

