अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
Maharashtra : बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे आता ही खाती कोणाकडे द्यायची, तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोण सांभाळणार यावर राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षात महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत.
महायुती सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांचा प्रश्न
अजित पवार यांच्या निधनानंतर महायुती सरकारमध्ये मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा यासारखी संवेदनशील आणि महत्त्वाची खाती रिक्त झाल्याने मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षांमध्ये नव्या वाटपावर चर्चा सुरू आहे. या खात्यांचा कारभार कोणत्या नेत्याकडे द्यायचा, यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा प्रस्ताव
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच, अजित पवार यांच्या निधनानंतर मात्र पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष वेगळी चूल ठेवून चालवण्याची भूमिका घेतली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विलिनीकरणाऐवजी स्वतंत्र नेतृत्वावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसते.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सध्याचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव पक्षातील नेत्यांकडून मांडला जात आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी होत आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा सुरू केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याशी बैठक, पार्थ पवारांचा प्रस्ताव
अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानमध्ये अंतिम निरोप दिल्यानंतर त्यांच्या सहयोग बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवारही उपस्थित होते. या वेळी पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी, तर स्वतःला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.
विलिनीकरणाचा अंतिम निर्णय शरद पवारांकडे?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अजित पवार हयात असतानाच सुरू होती. मात्र या विषयावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


