Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. 

Ajit Pawar Death : महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद

या दुःखद घटनेमुळे बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच दुखवट्याच्या काळात कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.