Ajit Pawar Plain Crash : बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी आणि सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला. 

Ajit Pawar Plain Crash : महाराष्ट्र झोपेतून उठत असतानाच एक धक्कादायक बातमी राज्यभर पसरली आणि अवघ्या काही क्षणांतच वातावरण शोकमग्न झाले. बारामती येथे अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन पायलट, एक क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. दिलदार, दिलखुलास आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व अकाली हरपल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

विमान दुर्घटनेत पिंकी माळी यांचाही दुर्दैवी अंत

या दुर्घटनेत विमानातील क्रू मेंबर असलेल्या पिंकी माळी या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. पिंकी दररोज आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलायची, मेसेज करून आपली सुरक्षितता कळवायची. मात्र आज सकाळपासून तिचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि काही वेळातच ती भीती खरी ठरली. पिंकीचे वडील स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. काही दिवसांपूर्वी पिंकीने त्यांची अजित पवारांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. आजच्या प्रवासातही ती वडिलांचे बोलणे करून देणार होती, मात्र त्याआधीच काळाने घाला घातला.

पिंकी माळींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पिंकी माळींचे पूर्ण नाव कर्तु शिवकुमार माळी असून ती मुंबईत राहत होती. तिच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या तरुण वयात कुटुंबाचा आधार बनलेली लेक अचानक हिरावली गेल्याने घरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून पिंकीच्या मनमिळाऊ स्वभावाची आठवण काढली जात आहे.

सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश

या अपघातात अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी बारामतीकडे धाव घेतली. सकाळी कामावर जाताना विदीपला पाहिलेल्या शेजाऱ्यांना काही तासांतच ही दु:खद बातमी समजली. टीव्हीवर बातमी झळकताच त्यांच्या आईने रडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात पोलीस घरी येऊन त्यांना बारामतीला घेऊन गेले. विदीप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

महाराष्ट्र हळहळला, मदतीची मागणी

विदीप जाधव हे पोलिस दलात असूनही अत्यंत मनमिळाऊ, मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीची मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेजाऱ्यांकडून करण्यात येत आहे.