कल्याण-मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅनचा चेंदामेंदा होऊन अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

ठाणे : कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ कल्याण-मुरबाड महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. प्राथमिक माहितीनुसार, व्हॅनमधील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बचावकार्य वेगात झाले सुरु 

घटनास्थळी अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र धडक इतकी भीषण होती की अनेक प्रवाशांना वाचवणे शक्य झाले नाही. पोलिस आणि बचाव पथकेही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये काही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

कारण झाले नाही स्पष्ट 

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. अशा प्रकारच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ती कशी थांबवता येईल यादृष्टीने प्रयत्न करायला हवे.