साताऱ्यातील एका PSIने अनुसूचित जातीच्या तरुणीशी लग्न करून नंतर नाकारल्याने त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने तिच्याकडून पैसे घेतले, शारीरिक संबंध ठेवले आणि गर्भपात करवून घेतला.

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका ३२ वर्षीय युवकाने, पोलिस उपनिरीक्षक होण्यापूर्वी, एका २८ वर्षीय अनुसूचित जातीतील तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, काही वर्षांनंतर तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार दिल्याने, विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या वडील आणि भावाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारीदरम्यान झाली होती. ओळख प्रेमात बदलताच आरोपीने नोंदणी पद्धतीने तिच्याशी लग्न केले. मात्र, तो विवाह गुप्त ठेवत तिला समाजात पत्नी म्हणून कधीच स्वीकारले नाही. त्याने तरुणीकडून १० ते १२ लाख रुपये घेतले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर जबरदस्तीने गर्भपातही करवून घेतल्याचा आरोप आहे.

पुढे पोलिस सेवेत निवड झाल्यानंतर तरुणीने जबाबदारीची अपेक्षा केली असता, आरोपीने 'तुझ्या जातीमुळे माझे घरचे तुला स्वीकारणार नाहीत' असे सांगत संबंध तोडले. शेवटी न्याय मिळावा म्हणून तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार २०२० ते २०२५ या कालावधीत घडला असून, या तक्रारीनंतर आरोपी उपनिरीक्षक आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.