पुण्याच्या आळंदीतील एका अकॅडमीचे ८ विद्यार्थी रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्वजण सहलीसाठी गेले होते. या ग्रुपमध्ये एकूण ४८ जण होते. पोलिसांनी सर्व ८ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
रायगड : रायगड येथील दिवेआगार समुद्रात ८ विद्यार्थी बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने सांगितलं की, पुण्याच्या आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी'चे विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी दिवेआगरला आले होते. या ग्रुपमध्ये २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जण होते.
दिवेआगर समुद्रात मोठी दुर्घटना
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. आता या सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत.
नेत्यांकडून शोक व्यक्त
या घटनेनंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी प्रशासनाला बचावकार्य आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचनाही दिल्या. सुनेत्रा पवार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या बातमीने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही आणखी माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. जे विद्यार्थी जखमी झाले आहेत, ते सुखरूप घरी परतावेत, अशी मी प्रार्थना करते," असं सुळे म्हणाल्या.

