Mumbai Pune Missing Link : पावसाळ्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचा लोणावळा-खंडाळा भाग अक्षरशः नंदनवन बनतो. दुधासारखे वाहणारे धबधबे आणि ढगांनी झाकलेले डोंगर या रस्त्याला स्वर्गासारखं बनवतात. पण, या सौंदर्यासोबत दरड कोसळण्याचा धोकाही असतो, त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुंबई/पुणे : पावसाळा आला की सह्याद्रीच्या डोंगररांगा आपल्याला एक वेगळंच रूप दाखवतात. डोंगरांमधून दुधासारखे फेसाळत येणारे धबधबे, डोंगरांना बिलगलेले पांढरेशुभ्र ढग... हे सगळं अनुभवायचं असेल तर जंगलात जायला हवं असं नाही. मुंबईजवळच एक अशी जागा आहे, जिथे तुम्हाला हाच अनुभव मिळेल. ती जागा म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे. सध्या याच रस्त्यावरच्या लोणावळा-खंडाळा भागातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

'इथं स्वर्गच अवतरलाय'

या व्हिडीओमध्ये हिरवीगार झालेली सह्याद्रीची डोंगररांग, त्यावर दाटलेलं धुकं, खाली उतरलेले ढग आणि कड्यांवरून कोसळणारे खळाळते धबधबे दिसत आहेत. पावसाळ्यात या रस्त्याचा हा भाग म्हणजे जणू 'स्वर्ग' आहे, अशा कमेंट्स अनेकजण सोशल मीडियावर करत आहेत. सततच्या पावसामुळे डोंगराच्या उतारावर अनेक छोटे-मोठे तात्पुरते धबधबे तयार झाले आहेत. पावसाचे काळे ढग जेव्हा डोंगरांना झाकून टाकतात आणि धुक्यामुळे रस्त्याला एक वेगळीच गूढता येते, तेव्हा हे दृश्य खरंच पाहण्यासारखं असतं. एरव्ही फक्त एक वर्दळीचा हायवे म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता पावसाळ्यात निसर्गाची एक सुंदर मेजवानीच देतो.

सुंदर आहे, पण जपून!

मावळ भागातून जाणारा हा 'मिसिंग लिंक' प्रकल्प सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्या, धबधबे आणि निसर्गरम्य परिसरातून जातो. जुन्या खंडाळा-लोणावळा घाट रस्त्याला पर्याय म्हणून हा नवीन रस्ता बांधण्यात आला आहे. यामध्ये लांब बोगदे, उंच पूल आणि केबल-स्टेड ब्रिजसारख्या आधुनिक गोष्टी आहेत. खोपोली एक्झिट आणि लोणावळ्याजवळील कुसगावला जोडणारा हा १३.३ किलोमीटर लांबीचा 'मुंबई-पुणे मिसिंग लिंक' प्रकल्प आहे.

अंदाजे ६,६९५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रस्त्यात एकूण १०.५५ किलोमीटर लांबीचे दोन मोठे बोगदे आणि ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आहे. मात्र, प्रशासनाने एक इशाराही दिला आहे. मुसळधार पावसात या डोंगराळ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण, गेल्या जुलै महिन्यात बोगदा क्रमांक २ जवळ दरड कोसळल्याने वाहतूक तब्बल १८ तासांपेक्षा जास्त वेळ थांबली होती.