- Home
- lifestyle
- World Smile Day 2025 : वर्ल्ड स्माइल डे का साजरा करतात? वाचा निखळपणे हसण्याचे आरोगयदायी फायदे
World Smile Day 2025 : वर्ल्ड स्माइल डे का साजरा करतात? वाचा निखळपणे हसण्याचे आरोगयदायी फायदे
World Smile Day 2025 : वर्ल्ड स्माईल डे हा केवळ हास्य साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो दयाळूपणा, एकतेचा आणि मानवतेचा संदेश देतो. २०२५ ची थीम "Smiles Connect the World" आपल्याला स्मरण करून देते की एक छोटी स्माईल जगाला जवळ आणू शकते.

वर्ल्ड स्माईल डेची कथा
वर्ल्ड स्माईल डे (World Smile Day) दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. याची सुरुवात अमेरिकन ग्राफिक आर्टिस्ट हार्वी बॉल (Harvey Ball) यांनी केली. १९६३ मध्ये त्यांनी प्रसिद्ध "स्माईली फेस" लोगो डिझाइन केला, जो जगभर आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक ठरला. लोकांनी स्माईली चिन्हाचा वापर तर मोठ्या प्रमाणावर केला, पण त्यामागील भावनिक अर्थ विसरू लागले. त्यामुळे १९९९ मध्ये हार्वी बॉल यांनी "वर्ल्ड स्माईल डे" सुरू केला. त्यांचा उद्देश साधा होता – एक दिवस असा असावा की ज्यादिवशी लोकांनी कुणाला तरी हसवावं आणि आनंद द्यावा.
या दिवसाचं महत्व
आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत हसू हे सकारात्मक ऊर्जा देणारं औषध मानलं जातं. वर्ल्ड स्माईल डे आपल्याला आठवण करून देतो की, एखाद्याच्या चेहऱ्यावर आणलेलं हास्य हे मोठं दान असतं. लहानशी स्माईल नात्यांमधली दरी मिटवू शकते, राग शमवू शकते आणि आत्मविश्वास वाढवू शकते. हा दिवस आपल्याला मानवतेचं महत्व, दयाळूपणा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. "Do an act of kindness. Help one person smile" हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे.
वर्ल्ड स्माईल डे २०२५ ची थीम
२०२५ मध्ये वर्ल्ड स्माईल डेची थीम आहे “Smiles Connect the World” (हास्य जगाला जोडतं). या थीमद्वारे जागतिक स्तरावर हास्याचं महत्व अधोरेखित केलं जातंय. भाषा, धर्म, संस्कृती, प्रांत या सर्व भेदांपलीकडे हास्य माणसांना एकत्र आणतं. सोशल मीडिया, सामुदायिक उपक्रम, शाळा आणि ऑफिसमधील साजरे केलेले कार्यक्रम यामधून या थीमचा संदेश पसरवला जाणार आहे.
हसण्याचे आरोग्यदायी फायदे
हास्य हे फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे. हसताना एंडॉर्फिन्स नावाचे आनंददायी हार्मोन्स मेंदूत तयार होतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो. रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. नियमित हसणाऱ्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. हसल्याने पोटातील स्नायूंना व्यायाम मिळतो आणि फुफ्फुसांमध्ये ताज्या ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हास्य हे नैसर्गिक "स्ट्रेस बस्टर" आहे.

