फक्त एका दिवसाच्या सोहळ्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च करण्याऐवजी तो पैसा भविष्यासाठी का वापरू नये? केटरिंग, फोटोग्राफर, हॉल मालक पैसे घेऊन निघून जातात, पण त्याचा खरा आर्थिक फटका कुटुंबाला बसतो, असं एका तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक मोठा क्षण असतो. पण नातेवाईकांना दाखवण्यासाठी त्यावर लाखो रुपये खर्च करणं कितपत योग्य आहे? याच मुद्द्यावर बंगळूरुमधील एक चार्टर्ड अकाउंटंट, मीनल गोयल हिने एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मीनलच्या मते, नातेवाईकांना इम्प्रेस करण्यासाठी लग्नावर 20 लाख रुपये खर्च केल्यास तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो.
तिने या 20 लाखांचा हिशोबही दिला आहे: जेवणासाठी 6 लाख, हॉलसाठी 5 लाख, डेकोरेशनसाठी 3 लाख, फोटोग्राफीसाठी 2 लाख, मनोरंजनासाठी 2 लाख आणि इतर खर्चांसाठी 2 लाख. मीनल म्हणते, 'फक्त 48 तासांत हॉल रिकामा होतो, जेवण संपतं, सजावट काढली जाते आणि पाहुणे पुढच्या लग्नाला निघून जातात. पण एकच गोष्ट तुमच्यासोबत राहते - तो म्हणजे या खर्चाचा आर्थिक बोजा.'
केटरिंगवाले, फोटोग्राफर, हॉल मालक आणि डीजेवाले तर आपले पैसे घेऊन निघून जातात, पण या खर्चाचा खरा फटका त्या कुटुंबाला बसतो. एका दिवसाच्या दिखाव्यासाठी सगळी बचत खर्च करण्याऐवजी, तो पैसा भविष्यातील गरजांसाठी बाजूला ठेवावा, असं मीनल सुचवते. हा पैसा घरासाठी डाऊन पेमेंट, इमर्जन्सी फंड, दीर्घकालीन गुंतवणूक, मुलांचं शिक्षण किंवा कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी कामी येऊ शकतो.
लग्न हा एक सोहळा नक्कीच आहे, पण तो तुमच्यावर आर्थिक ओझं बनू नये. 'आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करा, चांगल्या आठवणी तयार करा. आर्थिक तणावाशिवाय शांततेत वैवाहिक जीवन सुरू करा. फक्त सोहळे मोठे करण्याऐवजी, एक चांगलं वैवाहिक आयुष्य घडवा,' असं मीनलने म्हटलं आहे. तिची ही पोस्ट अनेकांना पटली आहे. खरंच, कर्जाच्या डोंगराखाली दबण्यापेक्षा साधेपणाने सुरुवात करणं कधीही चांगलं, नाही का?


