थंडीच्या दिवसांत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. पण रोजच्या जगण्यातील काही साधे नियम पाळले तर हा धोका नक्कीच कमी करता येतो.

मुंबई : हिवाळा म्हणजे फक्त सण आणि सुट्ट्यांचा काळ असतो का? तर डॉक्टर काही वेगळंच सांगतात. हा काळ हृदयासाठी सर्वात धोकादायक असतो. तापमान कमी झाल्यावर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं. त्यामुळेच हिवाळ्यात उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढते. तज्ज्ञांच्या मते, थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या बारीक होतात, याला Vasoconstriction म्हणतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. परिणामी हृदयाला जास्त वेगाने पंपिंग करावे लागते. ज्यांना आधीपासूनच कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा हाय प्रेशरचा त्रास आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. पण घाबरून जाण्यासारखं काही नाही. काही नियम पाळले तर हृदयावरील ताण कमी करणे आणि हा धोका आटोक्यात ठेवणे नक्कीच शक्य आहे.

काय काळजी घ्याल?

१. शरीर उबदार ठेवा, थंडीपासून संरक्षण करा: सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर उबदार ठेवणं. घराबाहेर पडताना स्वेटर, टोपी, मफलर आणि सॉक्स नक्की घाला. विशेषतः कान आणि छाती झाकून ठेवा. भल्या पहाटेची कडाक्याची थंडी टाळा आणि ऊन पडल्यावर, म्हणजे सकाळी ८ नंतरच मॉर्निंग वॉकला जा. रात्रीच्या वेळी घरातलं तापमान फार कमी होणार नाही, याची काळजी घ्या. एकदम गरम वातावरणातून थेट थंडीत जाऊ नका.

२. आहारात मीठ-तेल कमी करा, पाणी जास्त प्या: हिवाळ्यात चमचमीत पदार्थ, पिकनिक, बिर्याणी आणि तळलेले पदार्थ खाल्ले जातात. पण जास्त मीठ, तेल आणि फास्टफूडमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढतो. रोजच्या आहारात हिवाळ्यातील ताज्या भाज्या, जसं की पालक, फ्लॉवर, गाजर, बीटरूट आणि व्हिटॅमिन सी असलेली फळे- संत्री, पेरू, आवळा यांचा समावेश करा. तहान कमी लागली तरी दिवसातून २-२.५ लिटर पाणी प्यायला विसरू नका. कमी पाणी प्यायल्यास रक्त घट्ट होतं आणि हृदयावर ताण वाढतो.

३. सकाळी अचानक जड काम किंवा व्यायाम टाळा: झोपेतून उठल्या उठल्या जड व्यायाम करणे, धावणे किंवा जड वस्तू उचलणे टाळा. आधी अंथरुणात बसून हलके स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप करा. शरीर थोडं गरम झाल्यावर मगच व्यायामाला सुरुवात करा. थंडीत शरीरावर अचानक ताण पडल्यास रक्तदाब वेगाने वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका बळावतो.

४. प्रेशर-शुगर नियमित तपासा, औषधात खंड नको: ज्यांना आधीपासूनच हाय प्रेशर, मधुमेह किंवा हृदयाचा त्रास आहे, त्यांनी हिवाळ्यात रोज सकाळी आणि रात्री रक्तदाब तपासावा आणि नोंद ठेवावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नका किंवा डोस बदलू नका. छातीत दडपण, वेदना, डाव्या हातात किंवा मानेत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, जास्त घाम येणे किंवा चक्कर आल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जा.

५. धूम्रपान, मद्यपान आणि ताणतणावापासून दूर राहा: थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण धूम्रपान किंवा मद्यपान करतात, जे हृदयाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आणखी आकुंचन पावतात. याशिवाय ताणतणाव, रात्री जागणे, अतिश्रम यामुळेही रक्तदाब वाढतो. रात्री ७-८ तास पुरेशी झोप घ्या, योगा किंवा ध्यान करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.

थोडी काळजी घेतल्यास हिवाळ्यातही तुमचं हृदय निरोगी आणि सुरक्षित राहील. हिवाळ्याचा आनंद घ्या, पण हृदयाची काळजी घ्यायला विसरू नका.