Vastu Tips : नवीन घर, फ्लॅट किंवा वास्तू खरेदी केल्यानंतर वास्तुशांती करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी, तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी हा विधी केला जातो.

Vastu Tips :  स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वर्षांच्या कष्टानंतर जेव्हा नवीन घर, फ्लॅट किंवा व्यावसायिक जागा खरेदी केली जाते, तेव्हा त्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करण्याची परंपरा पाळली जाते. हिंदू धर्मात वास्तुशांती हा केवळ एक धार्मिक विधी नसून नवीन वास्तूमध्ये सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी केलेला एक शुभ संस्कार मानला जातो. त्यामुळे आजही अनेक कुटुंबे गृहप्रवेशापूर्वी वास्तुशांतीला विशेष महत्त्व देतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वास्तुशांची करण्याचे कारण

नवीन वास्तूमध्ये राहायला जाण्यापूर्वी वास्तुशांती करण्यामागे धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगम असल्याचे मानले जाते. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जागेवर विविध प्रकारच्या ऊर्जांचा प्रभाव असतो. घर बांधताना, जागेचे खोदकाम करताना किंवा बांधकाम प्रक्रियेदरम्यान अनेक प्रकारचे बदल घडतात. त्यामुळे त्या जागेतील असंतुलित किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तुशांती केली जाते.

विविध देवतांचे पूजन

वास्तुशांतीमध्ये वास्तुदेवता, पंचमहाभूते आणि विविध देवतांचे पूजन केले जाते. या विधीद्वारे त्या जागेची शुद्धी करून तेथे राहणाऱ्या व्यक्तींना आरोग्य, आनंद आणि मानसिक समाधान लाभावे, अशी प्रार्थना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, घरातील अडथळे, कलह, आर्थिक अडचणी आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी हा विधी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे गृहप्रवेशापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.

घरात सकारत्मक उर्जा येते

भारतीय संस्कृतीत घर हे केवळ चार भिंतींचे बांधकाम नसून कुटुंबाच्या भावना, नाती आणि भविष्याशी जोडलेले एक पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना ईश्वराचे आशीर्वाद मिळावेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे जीवन सुखमय व्हावे, या उद्देशाने वास्तुशांती केली जाते. यामुळे घरात सकारात्मक विचार, सौहार्द आणि मानसिक शांतता टिकून राहते, अशी श्रद्धा आहे.

आजच्या आधुनिक काळातही अनेक लोक वास्तुशांतीला महत्त्व देतात. काहीजण याकडे धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण नवीन सुरुवात करण्याचा एक शुभ संस्कार म्हणून स्वीकारतात. कोणतीही नवीन वास्तू ही आयुष्यातील महत्त्वाची गुंतवणूक आणि नवा अध्याय असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आनंद, समृद्धी आणि शुभतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी वास्तुशांती करण्याची परंपरा आजही कायम आहे.

(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीकडे केवळ एक सूचना म्हणून पाहावं.)