Sleep Tips : मध्यरात्री अचानक झोप का मोडते? या 3 चुका कधीच करू नका
रात्री बरोबर ३ वाजता तुमचीही अचानक झोप मोडते का? मग अशा वेळी कोणत्या ३ चुका टाळाव्यात आणि शांत झोपेसाठी काय करावे, हे नक्की जाणून घ्या.

मध्यरात्री अचानक झोप का मोडते?
शांत रात्र, गाढ झोप आणि अचानक डोळे उघडतात. घड्याळात पाहिलं तर बरोबर ३ किंवा ३:३० वाजलेले असतात. रोज याच वेळी झोप का मोडते? असा विचार करत आपण लगेच काही अशा चुका करतो, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ डोकं दुखत राहतं आणि थकवा जाणवतो. मध्यरात्री अशी झोप मोडली तर काय करावं आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत, याच्या ३ महत्त्वाच्या टिप्स.

झोप मोडल्यावर या ३ चुका टाळा!
१. घड्याळाकडे अजिबात पाहू नका: रात्री झोप मोडणे हा काही मोठा आजार नाही. पण डोळे उघडल्या उघडल्या घड्याळ पाहणं ही तुमची पहिली मोठी चूक असते. 'अरेच्चा, ३ वाजले! आता फक्त ३ तास उरलेत झोपायला. सकाळी ऑफिसला जायचंय आणि झोप तर येत नाहीये', असं आपलं डोकं लगेच विचार करू लागतं. हीच घाई आणि टेन्शन (Anticipatory Anxiety) शरीराला पूर्णपणे जागं करतं. यामुळे नैसर्गिकपणे येणारी झोपही उडून जाते. त्यामुळे वेळेकडे लक्ष देऊ नका, शांत पडून राहा, झोप आपोआप येईल.
२. मोबाईलला हात लावू नका: झोप मोडल्यावर अनेकांना सवय असते शेजारचा फोन घेऊन व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम रील्स किंवा बातम्या चेक करण्याची. मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश आणि सतत येणारे नोटिफिकेशन तुमच्या झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनला थांबवतात. तुम्ही सोशल मीडिया पाहिला नाही तरी चालेल, पण वेळ पाहण्यासाठी फोनची स्क्रीन ऑन केलीत तरी तो उजेड तुमच्या मेंदूला 'सकाळ झाली' असा चुकीचा संदेश देतो आणि पूर्ण जाग आणतो. त्यामुळे रात्री झोप मोडली तर फोन लांबच ठेवा. अंधार आणि शांतताच तुम्हाला पुन्हा झोपायला मदत करेल.
३. जबरदस्तीने अंथरुणावर पडून राहू नका: गरज नसताना अंथरुणावरून उठू नये हे खरंय. पण झोप येत नसतानाही कुशी बदलत पडून राहणं आणि चिडचिड करणं हे अगदी चुकीचं आहे. झोप मोडली की १५ ते २० मिनिटं शांत पडून राहा. तरीही झोप येत नसेल, कंटाळा आणि चिडचिड होत असेल, तर लगेच उठून बाहेर या. कमी प्रकाशात बसा आणि एखादं पुस्तक वाचा. डोळे जड होऊन पुन्हा झोप येऊ लागली की मगच अंथरुणावर जा. ही झोप न येण्यावरची एक वैज्ञानिक मानसशास्त्रीय उपचार पद्धत (CBT-I) आहे. बेड हा फक्त झोपण्यासाठी आहे, तिथे पडून राहून जागं राहण्यासाठी किंवा टेन्शन घेण्यासाठी नाही, हे मेंदूला पटवून देणं हा याचा उद्देश आहे. पण या वेळेत टीव्ही पाहणं किंवा मोबाईल वापरणं पूर्णपणे टाळा. बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन येऊ शकता.

