WhatsApp GhostPairing Scam Explained : भारतासह जगभरातील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी सावध राहावे. व्हॉट्सॲपच्या 'डिव्हाइस-लिंकिंग' फीचरचा गैरवापर करणाऱ्या 'घोस्टपेअरिंग' घोटाळ्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

WhatsApp GhostPairing Scam Explained : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि गंभीर इशारा आहे. 'घोस्टपेअरिंग' नावाचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, या घोटाळ्याच्या मोडस ऑपरेंडीचा वापर करून हॅकर्स व्हॉट्सॲपच्या 'डिव्हाइस-लिंकिंग' फीचरचा गैरवापर करून तुमचे व्हॉट्सॲप खाते नियंत्रित करू शकतात. ही एक अशी पद्धत आहे, जी हॅकर्सना पासवर्ड, सिम स्वॅप किंवा व्हेरिफिकेशन कोड (OTP) शिवाय वापरकर्त्याच्या व्हॉट्सॲप खात्यात पूर्ण प्रवेश देते. हा घोटाळा कोणताही सॉफ्टवेअर फॉल्ट न वापरता वापरकर्त्यांना फसवून ॲक्सेस मिळवतो.

घोस्टपेअरिंग हल्ला कसा काम करतो?

सायबर सुरक्षा फर्म जेन डिजिटलच्या अहवालानुसार, हा घोटाळा मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या संदेशाने सुरू होतो. या मेसेजमध्ये "हाय, मला तुमचा फोटो सापडला!" किंवा "या फोटोत तुम्ही आहात का?" असे काहीतरी निरुपद्रवी वाटणारे वाक्य असू शकते. या मेसेजसोबत एक लिंकही असते. अनेकदा ही लिंक फेसबुक फोटो किंवा पोस्टसारखी दिसते. लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट वेबपेज उघडते. कंटेंट पाहण्यासाठी, वापरकर्त्याला "व्हेरिफाय" करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉट्सॲप एक अधिकृत पेअरिंग कोड तयार करतो. वापरकर्त्यांना त्यांचा फोन नंबर टाकण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉट्सॲप एक कोड तयार करतो. हॅकर्स वापरकर्त्याला हा कोड बनावट पेजवर टाकण्यास सांगतात. ही एक सामान्य सुरक्षा तपासणी आहे असे समजून वापरकर्त्याने कोड टाकताच, नकळतपणे हॅकरचे डिव्हाइस त्यांच्या व्हॉट्सॲपशी लिंक होते.

हॅकर्सना व्हॉट्सॲपमध्ये कशाचा ॲक्सेस मिळतो?

कोड टाकताच, हॅकरला तुमच्या व्हॉट्सॲप वेबचा पूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमचे मेसेज वाचू शकतात, मीडिया डाउनलोड करू शकतात, तुमच्या नावाने मेसेज पाठवू शकतात आणि नवीन मेसेज पाहू शकतात. यातली सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तुमचा फोन सामान्यपणे काम करत राहतो. त्यामुळे तुमचा डेटा चोरला जात आहे हे तुमच्या लक्षातही येत नाही. घोस्टपेअरिंग घोटाळ्याची पद्धत सुरुवातीला युरोपच्या काही भागांमध्ये दिसून आली होती. आता हा धोका जगभरात वेगाने पसरत असल्याचे वृत्त आहे.

स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल?

घोस्टपेअरिंग घोटाळ्याचे बळी ठरण्यापासून वाचण्यासाठी व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी काही सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. तुमच्या व्हॉट्सॲपमधील सेटिंग्स > लिंक्ड डिव्हाइसेस (Settings > Linked Devices) वर नियमितपणे जा. तिथे कोणतेही अज्ञात डिव्हाइस किंवा ब्राउझर दिसल्यास, ताबडतोब लॉग आउट करा. कोणत्याही वेबसाइटवर व्हॉट्सॲपचा 'पेअरिंग कोड' टाकण्याची किंवा QR कोड स्कॅन करण्याची विनंती स्वीकारू नका. व्हॉट्सॲपवर 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' (Two-Step Verification) चालू करा, यामुळे सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर मिळतो. मित्राकडून जरी विचित्र लिंक आली, तरी त्यावर क्लिक करण्यापूर्वी खात्री करा. सावधगिरी हाच सर्वोत्तम बचाव आहे, कारण घोस्टपेअरिंगसारखे हल्ले तंत्रज्ञानापेक्षा माणसाच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात.