BP Tablets : चुकून एकाच वेळी बीपीच्या 2 गोळ्या खाल्ल्यात? मग हे नक्की वाचा
बीपीची गोळी घ्यायला विसरणं किंवा एकाच वेळी दोन गोळ्या खाणं, दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. यावर वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात, ते सविस्तर जाणून घेऊया.

एकाच वेळी बीपीच्या २ गोळ्या घेताय?
आजकाल उच्च रक्तदाब (High BP) ही खूप मोठी समस्या बनली आहे. बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अनेकजण रोज गोळ्या घेतात. बीपी वाढला तर हृदयविकार, पक्षाघात (स्ट्रोक) आणि किडनीचे आजार यांसारख्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. बीपी योग्य पातळीवर राहिला तरच हृदय आणि रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात.
काही लोकांसाठी बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज गोळी घेणं अत्यंत गरजेचं असतं. फक्त आहार आणि व्यायाम करून बीपी कमी होत नाही. ज्यांना जुनाट बीपीचा त्रास आहे, त्यांच्या बाबतीत हे वारंवार घडतं.
या गोळ्या रक्तवाहिन्या शिथिल करतात, रक्ताचे प्रमाण कमी करतात आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करून बीपी कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली गोळी रोज न चुकता घ्यायला हवी. पण अनेकदा कामाच्या गडबडीत आपण गोळी घ्यायला विसरतो.

गोळी घ्यायला विसरलात तर काय होईल?
तुम्ही एखाद वेळेस बीपीची गोळी घ्यायला विसरलात, तर थोड्या वेळासाठी तुमचा बीपी वाढू शकतो. यामुळे लगेच कोणताही मोठा धोका निर्माण होत नाही. पण जर तुम्ही वारंवार गोळी घ्यायला विसरत असाल, तर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनी निकामी होण्याची शक्यता खूप वाढते. काहींना डोकेदुखी, चक्कर येणे किंवा छातीत धडधडणे असा त्रासही होऊ शकतो.
अनेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि ते अगदी नॉर्मल वाटतात. पण सतत गोळ्या न घेतल्यास बीपी वाढतो आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. बीपी जास्त काळ वाढलेला राहिल्यास किडनी, डोळे आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका खूप वाढतो.
या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
गोळी घ्यायला विसरल्याचे आठवल्यास, लगेच ती गोळी खाऊन घ्या.
एखाद्या वेळेस गोळी घ्यायला विसरलो, म्हणून पुढच्या वेळी चुकूनही एकत्र दोन गोळ्या खाऊ नका.
जर तुम्ही सलग काही दिवस गोळी घ्यायला विसरला असाल, तर अजिबात वेळ न घालवता थेट डॉक्टरांना भेटा.
घरी असताना बीपी मॉनिटर (BP Monitor) मशीनच्या मदतीने तुमचा रक्तदाब नक्की तपासून पाहा.
डॉक्टरांना कधी भेटावे?
छातीत खूप जड वाटत असेल किंवा तीव्र वेदना होत असतील.
अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला असेल.
सहन न होण्याइतपत भयंकर डोकेदुखी सुरू झाली असेल.
चेहरा किंवा शरीराची एखादी बाजू सुन्न पडली असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल.
अचानक डोळ्यांसमोर अंधारी आली असेल किंवा बोलताना अडखळायला होत असेल.
थोडक्यात सांगायचे तर, एखाद वेळेस गोळी घ्यायला विसरलात तर डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. पुढच्या गोळीची वेळ जवळ आली नसेल, तर आठवल्याबरोबर गोळी घ्या. पण कोणत्याही कारणास्तव एकाच वेळी दोन गोळ्या अजिबात खाऊ नका.
