घरातील पांढऱ्या फरश्यांवरचे (टाईल्स) पिवळे आणि हट्टी डाग आता सहज काढता येतात. महागडी केमिकल्स न वापरता, घरातल्या साध्या वस्तू वापरून तुमच्या फरश्यांना पुन्हा नव्यासारखी चमक कशी द्यायची, यासाठीचे सोपे उपाय जाणून घ्या.

Tile Cleaning Tips : पांढऱ्या फरश्यांमुळे घराला एक स्वच्छ, चमकदार आणि आकर्षक लुक येतो. पण काही काळानंतर, या फरश्या पिवळ्या पडू लागतात. धूळ, साचलेला साबण आणि ओलाव्यामुळे त्यावर हट्टी डाग जमा होतात. विशेषतः बाथरूम आणि किचनमधल्या फरश्यांची चमक लवकर नाहीशी होते. अनेक जण फरश्या स्वच्छ करण्यासाठी महागडी केमिकल्स वापरतात, पण घरातल्या साध्या वस्तू वापरूनही तुम्ही फरश्यांना पुन्हा नव्यासारखं चमकवू शकता.

बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर

जर पांढऱ्या फरश्यांवर हलके पिवळे डाग दिसू लागले असतील, तर खाण्याचा सोडा (baking soda) आणि व्हाइट व्हिनेगर (white vinegar) यांचं मिश्रण खूप प्रभावी ठरतं. सगळ्यात आधी, फरश्यांवर खाण्याचा सोडा शिंपडा आणि नंतर त्यावर थोडं व्हिनेगर टाका. काही मिनिटं तसंच राहू द्या, म्हणजे डाग आणि मळ सुटायला मदत होईल. त्यानंतर, मऊ ब्रश किंवा स्पंजने हलक्या हातांनी घासून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायामुळे फरश्यांची चमक तर परत येतेच, पण दुर्गंधीही कमी होते.

लिंबाचा रस

जर फरश्यांवर दुसरे कसले डाग असतील, तर थेट डागांवर लिंबाचा रस लावा आणि १०-१५ मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर स्पंज किंवा ओल्या फडक्याने पुसून टाका. डाग खूप जुना असेल, तर लिंबाच्या रसात मीठ मिसळून डागावर लावा आणि मग पुसा. यामुळे डाग लवकर निघून जाईल.

क्लोरीन पेरॉक्साइडचा वापर करा 

साध्या उपायांनी डाग जात नसतील, तर तुम्ही क्लोरीन पेरॉक्साइड (chlorine peroxide) वापरू शकता. ते डागावर लावा, थोडा वेळ थांबा आणि मग फरशी चांगली स्वच्छ करा. यामुळे हट्टी डाग निघून जातील.

बेकिंग सोड्याचा वापर

फरश्यांवर गडद पिवळे डाग पडले असतील, तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून थोडा वेळ ठेवा आणि नंतर स्वच्छ करा. यामुळे पिवळेपणा पूर्णपणे निघून जाईल.