श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. श्रावणी सोमवारी शिवभक्त उपवास, शिवपूजा, अभिषेक आणि शिवमूठ अर्पण करून भगवान महादेवाची पूजा करतात. तर आज श्रावणातील पहिला सोमवार आहे.

मुंबई : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात भगवान महादेवाची भक्तिभावाने पूजा केली जाते. शिवभक्त शिवलिंगावर जलाभिषेक, दूध, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, भस्म आणि फुले अर्पण करतात. अनेक भाविक श्रावणी सोमवारचे व्रत पाळतात, रुद्राभिषेक करतात आणि ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करतात. याच काळात शिवमूठ व्रत करण्याचीही परंपरा आहे. श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर विशिष्ट धान्याची एक मूठ अर्पण केली जाते.

२०२६ मधील श्रावणी सोमवार आणि शिवमूठ

  • पहिला श्रावणी सोमवार – १७ ऑगस्ट २०२६: तांदूळ
  • दुसरा श्रावणी सोमवार – २४ ऑगस्ट २०२६: तीळ
  • तिसरा श्रावणी सोमवार – ३१ ऑगस्ट २०२६:मूग
  • चौथा श्रावणी सोमवार – ७ सप्टेंबर २०२६: गहू

शिवमूठ व्रत म्हणजे काय?

श्रावणी सोमवारी उपवास करून भगवान महादेवाची पूजा आणि शिवलिंगावर एक मूठ विशिष्ट धान्य अर्पण करण्याची परंपरा म्हणजे शिवमूठ व्रत होय. खरंतर, नवं विवाहित महिला लग्नानंतरची पहिली पाच वर्षे हे व्रत करतात, अशी परंपरा आहे. शिवपिंडीची पूजा केल्यानंतर जल, बेलपत्र आणि त्या दिवसानुसार ठरवलेले धान्य अर्पण केले जाते.

शिवमूठ व्रताचे धार्मिक महत्त्व

शिवमूठ व्रताबाबत धार्मिक श्रद्धा प्रचलित आहेत. हे व्रत केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, तसेच पती आणि कुटुंबीयांना दीर्घायुष्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने अनेक शिवभक्त हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात.

श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी?

श्रावणी सोमवारी सकाळी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर जवळच्या शिवमंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगाची पूजा करता येते. महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करून त्यानंतर चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुले, मध, फळे आणि साखर अर्पण करावी. अगरबत्ती लावून शिवलिंगासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि आरती करावी. तसेच सोमवारची कथा वाचावी.

प्रत्येक सोमवारी शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा

श्रावणातील प्रत्येक सोमवारी वरील क्रमाप्रमाणे महादेवाला शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवास आणि पूजेसोबत शिवमूठ अर्पण करून भगवान महादेवाची भक्तिभावाने आराधना केली जाते.