सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे चक्कर येणे, मळमळ, स्नायूंमध्ये थकवा आणि दुखापतीचा धोका वाढतो. त्यामुळे, व्यायामाच्या ३०-४५ मिनिटे आधी कर्बोदके (carbohydrates) असलेला हलका नाश्ता करणे उत्तम आहे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

मुंबई : आजकाल प्रत्येकासाठी आरोग्य खूप महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच, अनेकजण सकाळी वर्कआऊट करून दिवसाची सुरुवात करतात. विशेषतः तरुणांमध्ये सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचा ट्रेंड आहे. हीच योग्य पद्धत आहे, असा त्यांचा समज असतो. पण खरंच रिकाम्या पोटी व्यायाम करणं योग्य आहे का? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जर तुम्हीही रिकाम्या पोटी व्यायाम करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं चुकीचं का?

सकाळी काहीही न खाता व्यायाम केल्यास चक्कर येणे, मळमळणे किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता वाढते. याचं कारण म्हणजे, रात्रीच्या जेवणानंतर सकाळी उठेपर्यंत जवळपास ८ ते १० तास पोटात काहीच गेलेलं नसतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या लिव्हरमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनची (साठवलेले कार्बोहायड्रेट्स) पातळी खूप कमी झालेली असते. इन्सुलिनची पातळीही खाली आलेली असते. अशावेळी शरीराला ऊर्जेची गरज लागल्यास, आपलं मेटाबॉलिझम फॅटी ॲसिडस् (Fatty Acids) वापरून ऊर्जा निर्माण करायला सुरुवात करतं.

रिकाम्या पोटी व्यायामाबद्दल डॉक्टर काय सांगतात?

याविषयी साकेतमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पुष्पिंदर सिंग बजाज यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी व्यायाम करणं, विशेषतः हाय-इंटेन्सिटी व्यायाम (High-Intensity Exercise) केल्यास तुमची ताकद कमी लागू शकते. इतकंच नाही, तर स्नायू लवकर थकतात आणि दुखापत होण्याचा धोकाही वाढतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने कॉर्टिसोल (Cortisol) या स्ट्रेस हार्मोनची पातळी अचानक वाढते. जे लोक आधीपासूनच मानसिक तणाव, निद्रानाश किंवा थायरॉईडच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा अतिरिक्त ताण सततच्या थकव्याचं कारण बनू शकतो.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रक्तातील साखरेची पातळी कमी असताना व्यायाम केल्यास चक्कर येणे, मळमळणे किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करायचाच असेल, तर खूप हलके व्यायाम प्रकार निवडा. व्यायामाच्या ३० ते ४५ मिनिटे आधी कर्बोदके (Carbohydrates) असलेला हलका नाश्ता केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.