झाडांना जीव असतो हे आपल्याला माहीत आहे. पण ती एकमेकांशी बोलत नाहीत, त्यांच्यात कसलाच संपर्क नसतो असा आपला समज असतो. घनदाट जंगलात झाडं नुसतीच उभी असतात असं आपल्याला वाटतं. पण आपला समज चुकीचा आहे. झाडंही एकमेकांच्या संपर्कात असतात.

जंगलातील झाडांबद्दल आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची विज्ञानाकडे रंजक उत्तरे आहेत. संशोधनानुसार, झाडं एकमेकांच्या संपर्कात असतात. हवेत सोडलेली काही रसायने आणि जमिनीखालील फंगसच्या माध्यमातून आजूबाजूच्या इतर झाडांना काही संकेत पोहोचवतात. यालाच प्लांट कम्युनिकेशन म्हणजेच झाडांमधील संवाद असं म्हणतात.

हवेच्या माध्यमातून संकेत

जेव्हा कीटक एखाद्या झाडाची पाने खाऊ लागतात किंवा झाडाला इजा होते, तेव्हा त्याच्या आत काही बदल सुरू होतात. यावेळी झाड हवेत व्होलाटाइल ऑर्गॅनिक कंपाउंड्स (VOCs) नावाची रसायने सोडतं. आजूबाजूची झाडं हा वास ओळखू शकतात. यावरून ती आपली संरक्षण यंत्रणाही सक्रिय करू शकतात. म्हणजेच, एका झाडावर कीटकांनी हल्ला केल्यास आजूबाजूची झाडंही सावध होण्याची शक्यता असते. काही झाडांमध्ये अशा रासायनिक संकेतांमुळे कीटकांच्या हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता वाढल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

२०१४ मध्ये 'Ecology Letters' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ४८ संशोधनांच्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले. नुकसान झालेल्या झाडांच्या शेजारील इतर झाडांमध्ये कीटकांशी लढण्याची क्षमता वाढल्याचे पुरावे मिळाले. मात्र, सर्वच झाडांमध्ये असे होते असे नाही. झाडांची प्रजाती आणि वातावरणानुसार याचा परिणाम बदलतो.

झाडांच्या मुळांखालीही आहे एक नेटवर्क

झाडांच्या मुळाभोवती मातीत मायकोरायझल फंगस असतात. ते त्यांच्या पातळ दोऱ्यांसारख्या रचनेद्वारे झाडांच्या मुळांशी संपर्क प्रस्थापित करतात. हे फंगस झाडांना मातीतून पाणी आणि खनिजे शोषून घेण्यास मदत करतात. बदल्यात, झाडे प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केलेल्या साखरेतून फंगसला कार्बन पुरवतात.

कधीकधी एकाच फंगस नेटवर्कचा अनेक झाडांच्या मुळांशी संपर्क असू शकतो. याला कॉमन मायकोरायझल नेटवर्क म्हणतात. या नेटवर्कच्या माध्यमातून एका झाडाकडून दुसऱ्या झाडाला मोठ्या प्रमाणात पोषक घटक किंवा धोक्याचे इशारे पाठवले जातात, यासाठी अद्याप पुरेसे पुरावे नाहीत.

मोठी झाडं लहान रोपांना मदत करतात का?

वैज्ञानिक अद्याप झाडे आणि फंगस यांच्यातील या संबंधाचा अभ्यास करत आहेत. २०२३ मध्ये 'Nature Ecology & Evolution' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका आढावा लेखात याबद्दलच्या काही लोकप्रिय समजुतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोठी झाडं जमिनीखालील फंगस नेटवर्कच्या माध्यमातून लहान रोपांना ओळखतात आणि त्यांना आवश्यक पोषक तत्त्वे किंवा धोक्याचे इशारे पाठवतात, असे म्हटले जाते. मात्र, सध्यातरी अशी प्रक्रिया घडत असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. म्हणजेच, झाडांमध्ये अजिबात संपर्क नसतो असे नाही. हवेतील रासायनिक संकेतांना झाडांचा प्रतिसाद आणि मुळांशी फंगसचा संपर्क हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.