Parenting Tips : मुलं अनेकदा भीती, शिक्षा टाळण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी खोटं बोलतात. वर्तनातील बदल, उत्तरांमधील विसंगती, डोळ्यांचा संपर्क टाळणं आणि आवाजातील बदल ही खोटेपणाची लक्षणं असू शकतात.
Parenting Tips : मुलं मोठी होत असताना कधी ना कधी खोटं बोलतात, हे अनेक पालकांसाठी चिंतेचं कारण ठरतं. काही वेळा भीती, शिक्षा टाळण्याची इच्छा किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुलं खोटं बोलतात. मात्र, सतत खोटं बोलणं ही सवय बनल्यास ती भविष्यातील वर्तनावर परिणाम करू शकते. त्यामुळे मुलं खोटं बोलतायत का, आणि ते ओळखायचं कसं, हे पालकांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
वर्तनातील अचानक बदलांकडे लक्ष द्या
मुलं खोटं बोलत असतील तर त्यांच्या वर्तनात अचानक बदल दिसून येतात. ते एखाद्या प्रश्नावर घाबरट होतात, विषय बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा अस्वस्थ वाटू लागतात. साध्या गोष्टींवर अति प्रतिक्रिया देणं, चिडचिड करणं किंवा शांत बसून राहणं ही देखील खोटेपणाची लक्षणं असू शकतात. पालकांनी मुलांच्या देहबोलीकडे (Body Language) लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
उत्तरांमध्ये विसंगती आढळते का ते तपासा
खोटं बोलणाऱ्या मुलांच्या उत्तरांमध्ये अनेकदा विसंगती दिसते. एखादी घटना विचारल्यावर प्रत्येक वेळी वेगळी गोष्ट सांगणं, तपशील विसरणं किंवा अतिशयोक्ती करणं ही खोटेपणाची चिन्हं असू शकतात. पालकांनी राग न दाखवता शांतपणे प्रश्न विचारल्यास मुलांची खरी गोष्ट सहज समजू शकते.
डोळ्यांचा संपर्क आणि आवाजातील बदल
तज्ज्ञांच्या मते, खोटं बोलताना अनेक मुलं डोळ्यांचा थेट संपर्क टाळतात किंवा अति डोळ्यांत पाहतात. तसेच आवाजाचा टोन बदलणं, हळू बोलणं, अडखळणं किंवा खूप जलद बोलणं हेही खोटं बोलण्याचे संकेत असू शकतात. मात्र, प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे या संकेतांकडे एकत्रितपणे पाहणं आवश्यक आहे.
भीती आणि शिक्षा यांचं वातावरण कमी ठेवा
बहुतेक वेळा मुलं शिक्षा टाळण्यासाठी खोटं बोलतात. घरात सतत ओरड, दडपण किंवा तुलना असल्यास मूल सत्य सांगण्याऐवजी खोटं बोलणं पसंत करतं. पालकांनी सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण निर्माण केल्यास मुलं मोकळेपणाने सत्य सांगू लागतात. चूक मान्य केल्यावर योग्य मार्गदर्शन करणं हे खोटेपणा थांबवण्यासाठी प्रभावी ठरतं.
मुलांशी संवाद आणि विश्वास महत्त्वाचा
मुलांशी नियमित संवाद साधणं आणि त्यांचं ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यांना खोटं बोलल्यावर शिक्षा न करता त्यामागचं कारण समजून घ्यावं. गरज असल्यास बाल मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा.

