Reels Shorts Addiction : एकाग्रता कमी होते, निद्रानाश आणि नैराश्याचा वाढतो धोका
मुंबई - इन्स्टाग्राम रील्स आणि YouTube शॉर्ट्स सारखे छोटे व्हिडिओ सतत बघणं मेंदूसाठी धोकादायक असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. याचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात ते जाणून घ्या.

नवीन संशोधनातून समोर आलं
तुम्ही सतत रील्स आणि शॉर्ट्स बघता का? या छोट्या व्हिडिओचे तुम्हाला व्यसन लागले आहे का? असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आहे. सतत छोटे व्हिडिओ बघण्याची सवय तुमच्या मेंदूसाठी धोकादायक असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
एकाग्रता कमी करते
चीनमधील टियांजिन नॉर्मल विद्यापीठाच्या संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इन्स्टाग्राम रील्स आपलं एकाग्रता कमी करते.
व्यसनांच्या आहारी नेतो
न्यूरोइमेज जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा अतिवापर लोकांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो आणि व्यक्तींना जुगार आणि ड्रग्ज सारख्या व्यसनांच्या आहारी नेतो.
ब्रेन इमेजिंग अभ्यासात आढळून आलं
टिकटॉक, रील्स, शॉर्ट्स सारख्या प्लॅटफॉर्मचे व्यसन असलेले लोक आर्थिक नुकसानीकडे दुर्लक्ष करतात. घाईघाईत निर्णय घेण्याची शक्यता वाढते, असं ब्रेन इमेजिंग अभ्यासात आढळून आलं आहे.
जुगार, ड्रग्ज आणि शॉर्ट व्हिडिओ व्यसनांमध्ये साम्य
अशा वर्तनातील बदल विशिष्ट मेंदूच्या क्रियाकलापांशी संबंधित आहेत, असं न्यूरो इमेज जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून दिसून येतं. जुगार, ड्रग्ज आणि शॉर्ट व्हिडिओ व्यसनांमध्ये साम्य असल्याचं अभ्यासातून दिसून येतं.
पुन्हा बघण्याची इच्छा वाढते
रील्स आणि शॉर्ट्समधील सतत स्क्रोलिंग आणि वैयक्तिकृत कंटेंटमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि पुन्हा बघण्याची इच्छा वाढते. यामुळे मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो.
जागतिक आरोग्यासाठी धोका
शॉर्ट व्हिडिओ व्यसन हा जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असं टियांजिन नॉर्मल विद्यापीठाचे मानसशास्त्र प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख संशोधक क्वियांग वांग यांनी म्हटलं आहे.
लोक दररोज सरासरी १५१ मिनिटे शॉर्ट व्हिडिओ बघतात
चीनमध्ये लोक दररोज सरासरी १५१ मिनिटे शॉर्ट व्हिडिओ बघतात. ९५.५% इंटरनेट वापरकर्ते हे करतात. यामुळे लक्ष कमी होणे, अनिद्रा आणि नैराश्याचा धोका वाढतो.

