सौम्य वाटणारा स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा झटका भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करणे कसे जीवावर बेतू शकते आणि वेळेवर वैद्यकीय मदत घेणे का गरजेचे आहे, ते सविस्तर जाणून घ्या.

मुंबई : पन्नाशीच्या पार गेलेले एक गृहस्थ सकाळी उठतात, तेव्हा त्यांचा डावा हात थोडा जड पडल्यासारखा वाटतो. बोलताना शब्द थोडे अडखळतात. पण दुपारपर्यंत त्यांना थोडे बरे वाटू लागते. थकवा आला असेल किंवा झोपताना हात दाबला गेला असेल असा अंदाज कुटुंब लावते आणि ते दुसऱ्या दिवशी नेहमीसारखे कामावर निघून जातात.

आपल्याकडच्या बहुतांश कुटुंबांमध्ये हेच घडताना दिसते. लक्षणे सौम्य असतील किंवा ती आपोआप निघून गेली, तर त्याकडे आपण सहजासहजी दुर्लक्ष करतो. पण डॉक्टरांच्या मते हीच चूक पुढे जाऊन खूप महाग पडू शकते.

'सौम्य स्ट्रोक' म्हणजे नक्की काय?

वैद्यकीय भाषेत याला 'ट्रांझियंट इस्कॅमिक अटॅक' (TIA) म्हणजेच मिनी-स्ट्रोक म्हणतात. यामध्ये मेंदूला कोणताही कायमस्वरूपी धोका न पोहोचता लक्षणे काही वेळात निघून जातात. तर मायनर स्ट्रोकमध्ये लक्षणे कमी असतात, पण मेंदूच्या एका लहान भागाला इजा पोहोचलेली असते. इस्कॅमिक स्ट्रोकच्या जवळपास निम्म्या ते दोन-तृतीयांश रुग्णांमध्ये अशीच सौम्य लक्षणे दिसतात. लक्षणांचे प्रमाण कमी आहे म्हणजे रक्ताच्या गाठीची समस्या गंभीर नाही, असे अजिबात नसते. मायनर स्ट्रोक आलेल्या १० ते २० टक्के रुग्णांमध्ये मेंदूची मोठी रक्तवाहिनी बंद झालेली असते. पुढील काही तासांत किंवा दिवसांत त्यांची प्रकृती अधिक बिघडू शकते.

दुर्लक्ष करणे का घातक ठरू शकते?

अनेक अभ्यासांमधून एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सौम्य स्ट्रोक आलेल्या रुग्णांनाही भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच लोकांना स्मरणशक्ती कमजोर होणे, एकाग्रता न होणे, सतत थकवा जाणवणे, गाडी चालवताना त्रास होणे किंवा पूर्वीसारखे काम करता न येणे अशा अडचणी येतात. TIA हा एक प्रकारे धोक्याचा इशारा असतो. रक्तवाहिनी अरुंद होणे, त्यात चरबी जमा होणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित असणे ही कारणे शरीरात तशीच राहतात. पहिला झटका आल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्वात मोठा स्ट्रोक येण्याचा धोका असतो. पहिल्या आठवड्यात हा धोका ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढतो.

म्हणूनच पहिला झटका ही धोक्याची घंटा समजावी. त्यामागच्या कारणावर वेळेत उपचार केले नाहीत, तर पुढचा झटका खूप गंभीर असू शकतो.

आपले लोक कुठे वेळ वाया घालवतात?

आपल्याकडे काही नेहमीच्या सवयींमुळे रुग्णाला रुग्णालयात पोहोचवायला उशीर होतो:

  • लक्षणे आपोआप कमी होतात का, याची वाट पाहत बसणे
  • हा गॅसचा त्रास, अशक्तपणा किंवा बीपी कमी-जास्त झाल्याचा गैरसमज करून घेणे
  • आधी घरगुती उपाय करून पाहणे
  • मेंदूची स्कॅनिंग (CT Scan/MRI) सुविधा नसलेल्या स्थानिक क्लिनिकमध्ये जाणे
  • प्रकरण गंभीर वाटत नाही म्हणून रुग्णवाहिका (Ambulance) न मागवणे

लक्षणे सुरू झाल्यापासून साडेचार तासांच्या आत रक्ताची गाठ विरघळवणारे इंजेक्शन दिले तर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. मोठ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे काढण्यासाठी २४ तासांपर्यंत विशेष प्रक्रिया करता येतात. रुग्ण उशिरा पोहोचला किंवा लक्षणे निघून गेली असली, तरीही त्वरित चाचण्या करून रक्त पातळ करण्याची औषधे सुरू केल्यास दुसऱ्या स्ट्रोकचा धोका खूप पटीने कमी होतो. अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो.

कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे?

'BE-FAST' हा फॉर्म्युला लक्षात ठेवा:

  • B (Balance): अचानक शरीराचा समतोल जाणे
  • E (Eyes): अचानक दिसणे कमी होणे किंवा एकच वस्तू दोन दिसणे
  • F (Facial droop): चेहरा एका बाजूला वाकडा होणे
  • A (Arm weakness): एका बाजूचा हात किंवा पाय अचानक कमकुवत किंवा सुन्न होणे
  • S (Speech difficulty): बोलताना शब्द अडखळणे किंवा स्पष्ट न बोलता येणे
  • T (Time): ही लक्षणे दिसताच वेळ न घालवता तातडीने मदतीसाठी फोन करणे

याशिवाय अचानक तीव्र डोकेदुखी सुरू झाली, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे फक्त काही मिनिटांसाठीच दिसली तरी ती गंभीरच मानली पाहिजेत.

अशा वेळी नक्की काय करावे?

CT स्कॅन किंवा MRI सुविधा आणि स्ट्रोक केअर टीम उपलब्ध असलेल्या रुग्णालयात रुग्णाला त्वरित घेऊन जा. खासगी गाडी शोधण्यापेक्षा १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवा. रुग्णवाहिकेतील कर्मचारी रुग्णालयाला आधीच पूर्वकल्पना देऊ शकतात, ज्यामुळे उपचाराची तयारी आधीच करता येते. रुग्णाला शेवटचे कधी नॉर्मल पाहिले होते, ती वेळ लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर लक्षणे दिसली असतील, तर झोपल्याची वेळ हीच महत्त्वाची वेळ मानली जाते. याच वेळेवर कोणते उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात.

या आजारापासून बचाव करणेही तितकेच गरजेचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयाचे ठोके अनियमित असणे, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि प्रदूषण यांमुळे भारतात स्ट्रोकचे प्रमाण वेगाने वाढते आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि नियमित औषधे घेणे हाच यावर उत्तम उपाय आहे. शरीराने दिलेला छोटासा इशारा वेळेत ओळखला, तर भविष्यातील मोठा धोका टाळता येऊ शकतो.

  • (हा लेख डॉ. स्वाती सुरेन्द्नन नायर, कन्सल्टंट – न्यूरोलॉजी, मणिपाल हॉस्पिटल यशवंतपूर यांनी लिहिला आहे.)