Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला तिळगूळ खाण्याची परंपरा धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक कारणांशी जोडलेली आहे. तीळ आणि गूळ हिवाळ्यात शरीराला उष्णता व ऊर्जा देतात.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती हा सण सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रवासाची सुरुवात दर्शवतो आणि भारतीय संस्कृतीत तो अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत तिळगूळ वाटण्याची परंपरा आहे. पण मकर संक्रांतीला खास तिळगूळच का खाल्ले जाते, यामागे केवळ परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऋतुचक्राशी निगडित शास्त्रीय कारणे आणि सामाजिक संदेश दडलेला आहे.

धार्मिक आणि पौराणिक कारण

हिंदू धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या काळात तीळ आणि गूळ दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पुराणांमध्ये तिळाला पवित्र मानले असून, ते पापांचा नाश करतात अशी श्रद्धा आहे. मकर संक्रांतीला तीळ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते, अशी मान्यता आहे. त्यामुळेच या सणात तिळगूळ खाणे आणि वाटणे शुभ मानले जाते.

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

मकर संक्रांती हा सण साधारणपणे कडाक्याच्या हिवाळ्यात साजरा केला जातो. या काळात शरीराला उष्णता देणाऱ्या आणि ऊर्जा वाढवणाऱ्या अन्नाची गरज असते. तीळ उष्ण गुणधर्माचे असून शरीराला आवश्यक चरबी, कॅल्शियम आणि आयर्न पुरवतात. गूळ रक्ताभिसरण सुधारतो आणि पचनशक्ती वाढवतो. त्यामुळे तिळगूळ हा केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असा आहार आहे.

“तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” 

मकर संक्रांतीच्या शुभेच्छांमध्ये हमखास ऐकू येणारे वाक्य म्हणजे “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला”. या वाक्यातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. आयुष्यातील कटुता, मतभेद आणि राग बाजूला ठेवून एकमेकांशी प्रेमाने आणि गोड शब्दांत संवाद साधावा, असा यामागचा भाव आहे. तिळाचा किंचित कडूपणा आणि गुळाची गोडी मिळून जीवनातील गोड-करवे अनुभव स्वीकारण्याचे प्रतीक मानले जाते.

महाराष्ट्रासह भारतातील परंपरा

महाराष्ट्रात तिळगूळ वाटण्याची परंपरा विशेष लोकप्रिय आहे. तर उत्तर भारतात खिचडी, दक्षिणेत पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण साजरी केली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पदार्थांतून हा सण साजरा केला जात असला तरी तीळ आणि गुळाचे महत्त्व सर्वत्र समान आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा तिळगूळ हा एकता, आरोग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.