Longest Solar Eclipse 2027: जग शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाचे साक्षीदार होणार आहे. हे सूर्यग्रहण 6 मिनिटे 23 सेकंदांचे असेल. याला 21 व्या शतकातील सर्वात मोठ्या ग्रहणांपैकी एक मानले जात आहे. जाणून घ्या, भारतात हे ग्रहण दिसेल की नाही?
Surya Grahan 2027: खगोलीय घटनांमधील एक म्हणजे सूर्यग्रहण. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यावर सूर्यग्रहण होते. पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश चंद्रामुळे अडला जातो. खंडग्रास, खग्रास, कंकणाकृती असे सूर्यग्रहणाचे प्रकार आहेत. 2027मध्ये एका ऐतिहासिक सूर्यग्रहणाची नोंद होणार आहे. हे सूर्यग्रहण या शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणापैकी एक आहे. जगभरातील लोक या घटनेची साक्षीदार होणार आहेत. भारतीयांनाही हे सूर्यग्रहण पाहाता येईल का? जाणून घेऊया -
तुम्हाला अंतराळ आणि खगोलीय घटनांची आवड असेल, तर 2 ऑगस्ट 2027 ही तारीख कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. या दिवशी होणारे सूर्यग्रहण 21 व्या शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणांपैकी एक असेल. याला 'इक्लिप्स ऑफ द सेंचुरी' (Eclipse of the Century) म्हटले जात आहे. या दिवशी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि काही मिनिटांसाठी दिवसाढवळ्या अंधार पसरेल.
2027 चे सूर्यग्रहण इतके मोठे का आहे?
NASA आणि ग्लोबल ॲस्ट्रॉनॉमी डेटानुसार, हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण हे सूर्यग्रहण 6 मिनिटे 23 सेकंद टिकेल. हा कालावधी पृथ्वीवरून दिसणाऱ्या सूर्यग्रहणांपैकी सर्वात जास्त काळाचे आहे. यावेळी चंद्र आणि सूर्याची स्थिती अगदी अचूक असेल, ज्यामुळे आकाश गडद निळे किंवा हलके काळे होईल. शास्त्रज्ञ याला 21 व्या शतकातील सर्वात लांब आणि सर्वात महत्त्वाच्या खगोलीय घटनांपैकी एक मानत आहेत. इजिप्तमधील लक्सरजवळ (Luxor) हे ग्रहण सर्वाधिक काळ दिसेल.
कोणत्या देशांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण दिसेल?
या सूर्यग्रहणाचा संपूर्ण मार्ग (Path of Totality) दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला व्यापेल. यामध्ये स्पेन (Spain), मोरोक्को (Morocco), अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त (Egypt), सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया यांचा समावेश आहे. या ठिकाणी काही मिनिटांसाठी आकाश पूर्णपणे रात्रीसारखे दिसेल. संपूर्ण ग्रहणाच्या मार्गावरून जाणारी प्रमुख शहरे म्हणजे स्पेनमधील कॅडिझ, जिब्राल्टर, मोरोक्कोमधील टँजियर, लिबियामधील बेंगाझी, इजिप्तमधील लक्सर आणि सौदी अरेबियामधील जेद्दा.
भारतात 2027 चे सूर्यग्रहण दिसेल की नाही?
भारतात हे सूर्यग्रहण पूर्णपणे दिसणार नाही. येथील लोक फक्त आंशिक सूर्यग्रहण पाहू शकतील, ज्यामध्ये चंद्र, सूर्याचा फक्त एक भाग झाकतो. पूर्ण अंधार तर होणार नाही, पण सूर्याचा एक भाग झाकलेला दिसणे हे देखील खूपच रंजक असेल. भारतातील खगोलशास्त्राचे चाहते आणि विद्यार्थी याबद्दल खूप उत्सुक आहेत.
खग्रास सूर्यग्रहणात काय होते?
जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा काही मिनिटांसाठी अशी दृश्ये दिसतात, जी नेहमी दिसत नाहीत. आकाश सकाळ-संध्याकाळसारखे अंधुक (संधीप्रकाशासारखे वातावरण) होते, अनेक प्राण्यांच्या वागण्यात अचानक बदल होतो, आकाशात तारे आणि ग्रह चमकू लागतात, सूर्याचा कोरोना एका चमकदार रिंगसारखा दिसतो, तापमानात थोडी घट जाणवते.


