Lakshmi Puja 2025 : दिवाळीत पूजा करताना देवी लक्ष्मीच्या चित्राजवळ 'शुभ लाभ' नक्की लिहिले जाते. असे का करतात, हे फार कमी लोकांना माहीत आहे. जाणून घ्या कोण आहेत शुभ-लाभ?
Laksmi Pujan : आज देशभरात लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेचे विधान आहे. देवी लक्ष्मीची पूजा करताना तिच्या चित्राजवळ शुभ-लाभ आवर्जून लिहिले जाते. शुभ-लाभ कोण आहेत आणि दिवाळीच्या पूजेत त्यांची नावे का लिहितात, हे फार कमी लोकांना माहीत आहे. पुढे जाणून घ्या या परंपरेशी संबंधित रंजक गोष्टी...
कोण आहेत शुभ-लाभ?
दिवाळीची पूजा करताना देवी लक्ष्मीच्या चित्राजवळ स्वस्तिक चिन्ह काढले जाते आणि त्याच्या आजूबाजूला शुभ-लाभ लिहिले जाते. शुभ लाभ कोण आहेत याबद्दल धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. त्यानुसार, शुभ आणि लाभ ही भगवान श्रीगणेशाच्या मुलांची नावे आहेत, ज्यांना क्षेम-लाभ असेही म्हटले जाते. क्षेम म्हणजे कल्याण करणारा आणि लाभ म्हणजे प्रामाणिकपणे कमावलेला पैसा. सुखी आणि समृद्ध जीवनासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
दिवाळी पूजेत शुभ-लाभ का लिहितात?
दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा करताना तिच्या चित्राजवळ शुभ आणि लाभ लिहिण्याची परंपरा आहे. देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे. हा पैसा प्रामाणिक असेल तर त्याचे महत्त्व टिकून राहते. हा पैसा आपल्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो आणि अशुभ गोष्टी दूर करो, याच इच्छेने लक्ष्मी पूजेत शुभ-लाभ लिहिले जाते. ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे.
शुभ-लाभ कसे लिहावे?
दिवाळीला लक्ष्मी पूजन करताना शुभ-लाभ लिहिण्यासाठी शेंदूर किंवा कुंकू वापरावे. या दोन्ही गोष्टी पूजेसाठी शुभ मानल्या जातात. शेंदूर किंवा कुंकू नसल्यास केशराचाही वापर करू शकता. केशर गुरू ग्रहाशी संबंधित आहे, जो सर्व प्रकारे शुभ फळ देणारा मानला जातो. सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठरलेल्या ठिकाणी स्थापित करा. त्यानंतर आधी शुभ आणि नंतर लाभ लिहा. अशा प्रकारे लक्ष्मी पूजनाच्या वेळी शुभ-लाभ लिहिल्याने तुमची दिवाळी अधिक सुख-समृद्धीने परिपूर्ण होईल.
(Disclaimer : या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना मानावे.)
