घरात कोणाला अल्झायमर असेल, तर पुढच्या पिढीलाही तो होणार का? अशी भीती अनेकांना वाटते. आजी-आजोबा किंवा आई-वडिलांना हा आजार असल्यास तुम्हाला किती धोका आहे? अल्झायमर खरंच अनुवांशिक असतो का? यावर न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात, ते सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : वय वाढलं की विसरभोळेपणा वाढतो, हे अगदी सामान्य आहे. पण जेव्हा हा विसरभोळेपणा रोजच्या जगण्यात अडथळे आणतो, जवळच्या माणसांना ओळखता येत नाही किंवा रस्ते विसरायला होतात, तेव्हा तो अल्झायमर असू शकतो. घरात कोणाला हा आजार असेल, तर 'मलाही होणार का?' अशी भीती साहजिकच वाटते.

अल्झायमर अनुवांशिक असतो का?

डॉक्टरांच्या मते, अल्झायमरचे दोन प्रकार असतात.

१. सामान्य किंवा स्पोरॅडिक (Sporadic) अल्झायमर (९५% प्रकरणे): हा प्रकार ६५ वर्षांनंतर दिसून येतो. यासाठी कोणताही एक जनुक (जीन) जबाबदार नसतो. वाढतं वय, जीवनशैली, मधुमेह, ब्लड प्रेशर, धूम्रपान आणि लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे हा आजार होतो. घरात कोणाला हा आजार असेल, तर तुम्हाला तो होण्याचा धोका सामान्य माणसांपेक्षा दीड ते दोन पटीने वाढतो. पण तो होईलच, असं अजिबात नाही. आजी-आजोबांना होता म्हणजे तुम्हालाही होईल, याची कोणतीही गॅरंटी नाही.

२. अनुवांशिक किंवा फॅमिलीअल (Familial) अल्झायमर (५% पेक्षा कमी): हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. वयाच्या ३० ते ५० वर्षांतच याची सुरुवात होते. APP, PSEN1 आणि PSEN2 या तीन जनुकांमधील बदलांमुळे (म्युटेशन) हा आजार होतो. आई किंवा वडिलांमध्ये हे जनुक असल्यास, मुलांना हा आजार होण्याची शक्यता ५०% असते. कुटुंबात सलग दोन-तीन पिढ्यांमध्ये ४५ वर्षांच्या आधीच अल्झायमर झाला असेल, तरच या प्रकाराचा संशय घेतला जातो.

याशिवाय, APOE-e4 नावाचा एक रिस्क जीन असतो. हा जीन शरीरात असल्यास अल्झायमरचा धोका तीन ते चार पटीने वाढतो. पण हा जीन आहे म्हणजे आजार होईलच, असंही नाही.

तुम्हाला किती धोका आहे?

तुमच्या आजी-आजोबांना वयाच्या ८० व्या वर्षी अल्झायमर झाला असेल, तर तुम्हाला थोडासा धोका असू शकतो, पण घाबरण्यासारखं काही नाही. आई-वडील किंवा भावंडांना ६५ वर्षांच्या आधी हा आजार झाला असेल, तर धोका मध्यम स्वरूपाचा असतो. पण कुटुंबातील दोनपेक्षा जास्त सदस्यांना ६० वर्षांच्या आधीच अल्झायमर झाला असेल, तर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन जेनेटिक काउन्सिलिंग नक्की करा.

धोका टाळण्यासाठी आतापासून काय कराल? तज्ज्ञांच्या ५ टिप्स

अल्झायमरवर अद्याप कोणताही १००% खात्रीशीर उपाय नाही, पण तो टाळता नक्कीच येऊ शकतो. संशोधनानुसार, जीवनशैलीत बदल केल्यास ४०% प्रकरणांमध्ये हा आजार टाळता येतो.

१. मेंदूला सतत कामात ठेवा: नवीन भाषा शिकणे, पुस्तके वाचणे, बुद्धिबळ खेळणे किंवा गाणी शिकणे यांसारखे मेंदूचे व्यायाम करा. मोबाईलवर रिल्स बघण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचा.

२. हृदयाची काळजी घ्या, मेंदू निरोगी राहील: ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा. तेलकट पदार्थ, धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

३. झोप आणि व्यायाम: रोज ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. सात ते आठ तासांची शांत झोप घेतल्याने मेंदूतील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर पडतात.

४. लोकांशी संपर्कात राहा: एकटे राहू नका. मित्र आणि कुटुंबासोबत गप्पा मारा. एकटेपणा हे अल्झायमरचं एक मोठं कारण आहे.

५. कमी ऐकू येत असल्यास मशीन वापरा: संशोधनात असं दिसून आलंय की, कमी ऐकू येण्याच्या समस्येमुळे डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका वाढतो.

लक्षात ठेवा, कुटुंबात अल्झायमर आहे म्हणजे तुमचं भविष्य अंधारात आहे, असं अजिबात नाही. योग्य जीवनशैली आणि वयाच्या ४० वर्षांनंतर मेंदूची नियमित तपासणी तुम्हाला सुरक्षित ठेवू शकते. जर तुम्हाला सतत विसर पडत असेल, एकाच प्रश्नाची वारंवार पुनरावृत्ती करत असाल किंवा ओळखीचे रस्ते विसरत असाल, तर वेळ न घालवता न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.