जास्वंदीचं रोप लावण्यासाठी नर्सरीतून आणायची गरज नाही. एका फांदीपासून तुम्ही घरच्या घरी सहज रोप तयार करू शकता. योग्य काळजी घेतली तर ४-५ महिन्यांतच झाडाला सुंदर फुलं येतील. ही सोपी पद्धत स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊया.
Hibiscus Cutting Propagation: जास्वंदीचं झाड तुम्ही तुमच्या अंगणात किंवा कुंडीत अगदी सहज लावू शकता. याची मोठी आणि सुंदर फुलं तुमच्या बागेची शोभा वाढवतात. चांगली गोष्ट म्हणजे जास्वंदीचं रोप लावण्यासाठी तुम्हाला ते विकत आणायची गरज नाही. एका फांदीपासून (कटिंग) तुम्ही सहजपणे कुंडीत किंवा जमिनीत नवीन रोप तयार करू शकता. फांदीपासून जास्वंद लावण्यासाठी फेब्रुवारी-मार्च आणि पावसाळ्यात ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम मानले जातात. कारण या काळात हवेतील आर्द्रता आणि उष्णतेमुळे फांदीला मुळं फुटायला मदत होते. विशेष म्हणजे, फांदीपासून लावलेल्या जास्वंदीच्या रोपाला ४-५ महिन्यांत फुलं यायला सुरुवात होते.
फांदीपासून जास्वंद लावण्यासाठी लागणारं साहित्य
- एका निरोगी जास्वंदीच्या झाडाची हिरवी, मजबूत फांदी
- धारदार कात्री किंवा चाकू
- चांगली माती (बागेतील माती + कंपोस्ट + वाळू किंवा कोकोपीट यांचे मिश्रण)
- एक मध्यम आकाराची कुंडी किंवा ग्रो-बॅग (ज्याला पाणी जाण्यासाठी छिद्र असेल)
- पाणी

फांदीपासून रोप कसं तयार करायचं?
योग्य फांदी निवडा: एका चांगल्या झाडाची ६-१० इंच (१५-२५ सेंमी) लांब, हिरवी किंवा थोडी जून झालेली फांदी निवडा. या फांदीवर किमान ३-४ नोड्स (जिथून पानं फुटतात ती जागा) असायला हवेत.
फांदी तयार करा: फांदीचा खालचा भाग धारदार कात्रीने ४५-डिग्रीच्या कोनात तिरपा कापा. वरचा भाग सरळ कापला तरी चालेल. तिरप्या कापामुळे मुळं फुटायला जास्त जागा मिळते.
कुंडी तयार करा
कुंडीमध्ये ५०% बागेतील माती, ३०% कंपोस्ट आणि २०% वाळू किंवा कोकोपीट यांचे मिश्रण भरा. या मातीतून पाण्याचा निचरा चांगला होतो. माती थोडी ओलसर करा, पण चिखल होऊ देऊ नका. आता मातीत २-३ इंच खोल एक छिद्र करा.
फांदी कशी लावायची?
तयार केलेली फांदी कुंडीतील छिद्रात ठेवा आणि मातीने दाबून घट्ट करा.
फांदी फक्त २-३ इंच मातीत दाबा, बाकीचा भाग मातीच्या वर राहील याची खात्री करा. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडा. जास्त पाणी घालू नका.

जास्वंदीच्या रोपाची काळजी कशी घ्यायची?
- कुंडीला थोड्या उन्हात ठेवा (पहिले २-३ आठवडे थेट प्रखर उन्हापासून वाचवा).
- माती सुकल्यावरच पाणी द्या, जास्त ओलावा टाळा (नाहीतर मुळं सडू शकतात).
- दर १५ दिवसांनी हलकं खत (शेणखत किंवा कंपोस्ट) घाला.
- १५-३० दिवसांत नवीन पानं फुटायला लागतील, याचा अर्थ मुळं तयार झाली आहेत.
- झाडाला फुलं यायला ४-५ महिने लागू शकतात


