माणसांमधील चुका किंवा कमजोरी आपल्या लगेच लक्षात येते. पण त्याच माणसातले चांगले गुण, प्रामाणिकपणा आणि मेहनत ओळखण्याची वृत्तीच नात्याला अधिक घट्ट करते.

मुंबई : आपल्या जवळच्या माणसाची एखादी चूक आपल्याला लगेच खटकते. त्याने बोललेला एक वाईट शब्द मनात घर करून राहतो, एखादी अपूर्णता वारंवार आठवते किंवा एका दिवसाच्या वाईट वागण्यावरून वाटतं, 'हा माणूस असाच आहे!' पण तोच माणूस कितीतरी वेळा काहीही न बोलता आपल्या पाठीशी उभा राहिला असेल, कितीतरी वेळा स्वतःचा विचार न करता आपल्यासाठी काहीतरी केलं असेल, याचा हिशोब मात्र आपण ठेवत नाही.

माणसाचं मन बहुतेक असंच काम करतं. चांगल्या गोष्टी, चांगले क्षण आपल्याला गृहीत वाटतात, पण एक वाईट घटना मात्र मनात कायमची कोरली जाते. त्यामुळे नात्यातील तणावात आपण अनेकदा त्या माणसाऐवजी त्याच्या चुकांवरच जास्त लक्ष केंद्रित करतो. याच ठिकाणी आध्यात्मिक गुरू आणि लेखक गौर गोपाल दास आपल्याला थोडं थांबायला सांगतात. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, 'Anyone can find the dirt in someone. Be the one that finds the gold.' सोप्या भाषेत सांगायचं तर, कुणामध्येही वाईट शोधणं खूप सोपं आहे; खरं कौशल्य तर त्या माणसात लपलेलं 'सोनं' शोधण्यात आहे.

प्रत्येक माणसात खरंच 'सोनं' लपलेलं असतं का?

इथे 'Gold' म्हणजे खरंखुरं सोनं नाही. तर हे माणसाच्या त्या मौल्यवान गुणांचं प्रतीक आहे, जे नेहमी वरून दिसत नाहीत. एखाद्याचा कमालीचा संयम, कुणाची जबाबदारीची भावना, कुणाची मेहनत, कुणाचा मायाळूपणा, तर कुणाची कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती—हे सगळंच ते 'सोनं' असू शकतं. अडचण ही आहे की, हे गुण पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. पण चुका शोधायला फक्त काही सेकंद लागतात. ऑफिसमधल्या सहकाऱ्याने कदाचित एका महत्त्वाच्या कामात चूक केली असेल.

एखाद्या मित्राने गरजेच्या वेळी फोन उचलला नसेल. कुटुंबातील कुणीतरी असं काही बोललं असेल, ज्यामुळे आपलं मन दुखावलं गेलं असेल. या घटना नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण फक्त याच आधारावर त्या पूर्ण माणसाला पारखणं योग्य आहे का? कदाचित तोच सहकारी गेल्या काही महिन्यांपासून ऑफिसमध्ये सर्वाधिक जबाबदारी सांभाळत असेल. तोच मित्र याआधी अनेक कठीण काळात तुमच्यासोबत उभा राहिला असेल. कुटुंबातील त्याच व्यक्तीने स्वतःच्या अनेक गरजा बाजूला ठेवून तुमचा विचार केला असेल. एक चूक कधीकधी इतकी मोठी वाटते की, त्यामागे असलेल्या असंख्य चांगल्या गोष्टी आपल्याला दिसेनाशा होतात. चूक दाखवून देणं आणि माणसाला कमी लेखणं यात फरक आहे. कुणाची चूक झाली असेल, तर ती नक्कीच सांगितली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा अर्थ अन्यायाला पाठिंबा देणं नाही. पण आपण ती गोष्ट कशी सांगतो, यात मोठा फरक आहे. 'तू नेहमी असंच करतोस,' या वाक्यात त्या माणसाला पूर्णपणे अयोग्य ठरवण्याचा सूर असतो. त्याऐवजी, 'हे काम बरोबर झालं नाही, पण तू प्रयत्न केलास तर नक्कीच चांगलं करू शकतोस,' हे वाक्य समोरच्याला सुधारण्याची संधी देतं. कुटुंबात, मैत्रीत किंवा कामाच्या ठिकाणी हा छोटासा फरक खूप मोठा परिणाम घडवू शकतो. कारण प्रत्येक माणसाला वाटत असतं की, आपल्या चुकांसोबतच आपले प्रयत्नही कुणीतरी पाहावेत.

कौतुक इतकं महत्त्वाचं का आहे?

कौतुक म्हणजे फक्त कुणालातरी खूश करण्यासाठी गोड बोलणं नाही. खरं कौतुक एका माणसाला सांगतं की, 'तुझ्यातला हा चांगला गुण माझ्या लक्षात आला आहे.' ही भावना नात्यासाठी खूप मौल्यवान असते. एखाद्या मुलाला जर फक्त परीक्षेतील मार्कांवरून बोललं गेलं, तर त्याच्यातील इतर कलागुण हळूहळू मागे पडतात. एखाद्या कर्मचाऱ्याला मॅनेजर फक्त चुकांसाठीच ओळखत असेल, तर त्याची चांगलं काम करण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे, नात्यातही जर एका व्यक्तीला सतत तिच्या चुका ऐकाव्या लागल्या, तर हळूहळू संवादाची जागाच संपते. याउलट, योग्य वेळी केलेलं एक छोटंसं कौतुक माणसाला आणखी चांगलं काम करण्याची हिंमत देतं.

नातं म्हणजे दोन परफेक्ट माणसांची गोष्ट असते का?

खरं तर, कोणतंच नातं दोन परिपूर्ण माणसांनी बनलेलं नसतं. दोन अपूर्ण माणसं एकमेकांना समजून घेता घेताच नातं घट्ट होत जातं. त्यामुळे दीर्घकाळच्या नात्यात प्रश्न फक्त 'त्याने माझ्यासाठी काय चुकीचं केलं?' हा नसावा. कधीतरी स्वतःला विचारायला हवं, 'त्याने माझ्यासाठी किती वेळा चांगलं काही केलं आहे?', 'त्याच्या कोणत्या गुणाला मी आजपर्यंत महत्त्व दिलं नाही?', 'या माणसात असं काय आहे, ज्यामुळे हे नातं आजही मौल्यवान आहे?' या प्रश्नांमुळे कदाचित सगळ्या समस्या सुटणार नाहीत, पण तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या जवळच्या माणसाची चूक दिसेल, तेव्हा लगेच त्याला जज करण्याऐवजी थोडं थांबा. त्याच्या इतर चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. कदाचित अशी एखादी चांगली गोष्ट आठवेल, जी तुम्ही विसरून गेला असाल. कारण चुका शोधून माणसाला दूर करणं सोपं आहे, पण त्याच्या आतलं चांगलं शोधून त्याचा हात घट्ट धरणं, यातच खऱ्या नात्याचं सौंदर्य आहे.