Health News : दोरीच्या उड्या मारुन पोट कमी होईल का? दोरीच्या उड्यांनी शरीराला होणारे फायदे समजून घेऊ

| Published : Apr 16 2024, 07:00 AM IST

Skipping
Health News : दोरीच्या उड्या मारुन पोट कमी होईल का? दोरीच्या उड्यांनी शरीराला होणारे फायदे समजून घेऊ
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पोट कमी करण्यासाठी लोक नाना प्रयत्न करत असतात. व्यायामापासून ॲरोबिक्स पर्यंत विविध व्यायामप्रकारांनी पोट आणि वजन उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यायामामधलाच एक प्रकार म्हणजे ’दोरीवरच्या उड्या’.दोरीवरच्या उड्यांनी शरीराला होणारे फायदे समजून घेऊ.

 

पोट कमी करण्यासाठी लोक नाना प्रयत्न करत असतात. व्यायामापासून योगासनांपर्यंत आणि नृत्यापासून ॲरोबिक्स पर्यंत विविध व्यायामप्रकारांनी लोक पोट आणि आपले वजन उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यायामामधलाच एक प्रकार म्हणजे ’दोरीवरच्या उड्या’. आपल्यातल्या बहुतेकांनी लहानपणी दोरीवरच्या उड्या मारलेल्या आहेत; तरी आज त्या दोरी वरुन एखादी उडी मारायची तर क्षणभर विचार करावा लागेल; सरावाने ते जमते म्हणा. वास्तवात दोरी उड्या हा एक चांगला व्यायाम आहे, पण त्यामुळे पोट उतरवण्यास मदत होईल का? या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी दोरीवरच्या उड्यांनी शरीराला होणारे फायदे समजून घेऊ.

दोरीवरच्या उड्यांचे फायदे :

  • पायांची चपळता वाढवण्यासाठी,
  • पायांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी,
  • पोटर्‍यांचे-मांड्यांचे व नितंबांचे स्नायू सुदृढ व प्रमाणबद्ध होण्यासाठी,
  • हातांचे स्नायू सशक्त व लवचिक होण्यासाठी,
  • हृदयाला सक्षम करण्यासाठी व पर्यायाने तुमचा दम वाढवण्यासाठी दोरीउड्या हा व्यायाम निश्चित उपयुक्त आहे

हे खेळाडू देखील करतात हा व्यायाम :

त्यामुळे धावपटू, टेनिस व बॅडमिंटनपटू, बॉक्सर्स, मार्शल आर्टस्‌चे खेळाडू यांना; किंबहुना कोणत्याही खेळामध्ये खेळाडूची क्षमता वाढवण्यासाठी तो उपयुक्त आहे.

१० मिनिटे दोरीवरच्या उड्या खेळने इतक्या कॅलरी कमी होतात :

साधारण १० मिनिटे दोरीउड्या केल्यानंतर १०० कॅलरी जळतात. इतके कॅलरी जळतात याचा अर्थ शरीराचे वजन सुद्धा घटणार. होय, नित्यनेमाने दोरीउड्यांचा एकदा सराव होऊन तुम्ही सकाळ-सायंकाळ दोन वेळा १० मिनिटे दोरीउड्या केल्यात तर साधारण २०० कॅलरीज जळतील आणि एक तास दोरीउड्या मारल्यामुळे सरासरी ७००हून अधिक कॅलरीज जळतात. हे प्रमाण बरेच चांगले आहे. इतके कॅलरीज जळल्यामुळे शरीरामधील चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास ते साहाय्यक ठरते. मात्र याचा अर्थ दोरीउड्यांमुळे तुमच्या पोटाचा आकार कमी होईल, असे काही नाही.

सर्वांगासाठी उपयोगी असा व्यायाम :

हा सर्वांगासाठी उपयोगी असा व्यायाम आहे, जो चरबी घटवेल ,परंतु त्यामुळे खास पोटावरचीच चरबी कमी होईल, असे म्हणता येणार नाही. पोट उतरवण्यासाठी विशेष व्यायाम व त्याला पूरक आहार यांच्या जोडगोळीने पोटाची चरबी घटवता येईल.