- Home
- lifestyle
- Broccoli Chicken Fried Rice : ब्रोकोली चिकन फ्राईड राईस.. ही रेसिपी कराल तर मुलं आवडीने खातील!
Broccoli Chicken Fried Rice : ब्रोकोली चिकन फ्राईड राईस.. ही रेसिपी कराल तर मुलं आवडीने खातील!
Broccoli Chicken Fried Rice: रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडतो का? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आठवड्यातून एकदा तरी हा ब्रोकोली चिकन फ्राईड राईस करून बघा. चवीला भारी आणि आरोग्यालाही चांगला.

ब्रोकोली चिकन फ्राईड राईस रेसिपी
मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवायचा म्हणजे त्यात चवीसोबतच पोषक घटकही असायला हवेत. असंच एक मस्त कॉम्बिनेशन म्हणजे ब्रोकोली चिकन फ्राईड राईस. प्रोटीन देणारं चिकन, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेली ब्रोकोली, आणि पोट भरणारा भात.. हे तिन्ही एकाच डिशमध्ये आले की चवीला चव आणि पोषक तत्त्वेही मिळतात. डब्यात दिला किंवा घरात गरमागरम वाढला तरी मुलं आवडीने खातील. ही टेस्टी रेसिपी कशी बनवायची ते इथे पाहूया.

साहित्य
बासमती तांदूळ – २ कप (आधीच शिजवलेला)
बोनलेस चिकन – २०० ग्रॅम (लहान तुकडे)
ब्रोकोली – १ कप (लहान तुकडे)
गाजर – ½ कप (बारीक चिरलेलं)
फरसबी – ¼ कप
कांदा – १ (बारीक चिरलेला)
लसूण – १ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
अंडी – २ किंवा ३
मीठ – चवीनुसार
शेंगदाणा तेल – २ टेबलस्पून
स्प्रिंग अनियन (पात कांदा) – थोडेसे
सुकी लाल मिरची - ४
चिली गार्लिक पेस्ट - थोडीशी
कृती- स्टेप १
सर्वात आधी गॅसवर एक पसरट कढई ठेवा, ती गरम झाल्यावर त्यात तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण, सुकी लाल मिरची, गाजर, फरसबी, आणि कांदा घालून परतून घ्या. हे परतल्यावर, स्वच्छ धुवून बारीक तुकडे केलेलं बोनलेस चिकन घाला आणि चांगलं परतून घ्या. चिकन थोडं शिजल्यावर मीठ आणि चिली गार्लिक पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत ढवळून घ्या.
स्टेप-२
त्यानंतर गरम पाण्यातून काढून बारीक चिरलेली एक कप ब्रोकोली चिकनमध्ये घाला आणि चांगलं परतून घ्या. यात थोडासा बारीक चिरलेला पात कांदाही घाला आणि मीठ बरोबर आहे की नाही ते तपासा. कढईच्या मध्यभागी थोडी जागा करा आणि त्यात अंडी फोडून घाला. अंडी चांगली शिजून सुटसुटीत होईपर्यंत ढवळा.
स्टेप-३
शेवटी, आधी शिजवून थंड केलेला बासमती भात यात घाला आणि मसाला, भाज्या सगळं एकजीव होईल अशा प्रकारे भात न मोडता हलक्या हाताने मिसळा. तुम्हाला आवडत असेल तर या वेळेस थोडा सोया सॉस किंवा चिली सॉस घालू शकता. वरून उरलेला पात कांदा भुरभुरा.. तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी ब्रोकोली चिकन फ्राईड राईस तयार आहे.
मुलांचा आवडता फ्राईड राईस
ब्रोकोली चिकन फ्राईड राईस चविष्ट तर असतोच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. साधारणपणे फ्राईड राईससाठी बरेच लोक रिफाईंड तेल वापरतात. पण या रेसिपीसाठी शेंगदाणा तेल वापरलं तर चव आणि सुगंध अप्रतिम येतो. मुलं शाळेतून आल्यावर संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा दुपारी डब्यात गरमागरम दिला तर मुलं ताट नक्की रिकामं करतील. आठवड्यातून एकदा तरी मुलांना नक्की करून द्यायला हवी अशी ही एक हेल्दी रेसिपी आहे.

