Health Tips : सकाळी उठल्यानंतर होणारी डोकेदुखी ही खराब झोप, ताण, निर्जलीकरण, चुकीची स्लीप पोजिशन किंवा माइग्रेन यामुळे होऊ शकते. झोपेची गुणवत्ता सुधारून, पाणी पुरेसे पिऊन आणि तणाव कमी करून ही समस्या कमी होते.

सकाळी उठल्यानंतर डोकं दुखणं ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत खूपच सामान्य समस्या आहे. पण अनेक वेळा हे दुखणं तात्पुरतं समजून दुर्लक्ष केलं जातं. प्रत्यक्षात सकाळी उठल्यावर जाणवणारी ही वेदना शरीरातील झोपेची गुणवत्ता, स्ट्रेस, हार्मोन्स आणि जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयींमुळे निर्माण होते. या वेदनेची गंभीर कारणे ओळखून त्यावर योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे.

झोपेची गुणवत्ता खराब असणे

अपुरा किंवा खंडित झोप हा सकाळच्या डोकेदुखीचा प्रमुख कारणांपैकी एक आहे. रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूला पूर्ण विश्रांती मिळत नाही आणि सकाळी उठल्यावर मेंदूमध्ये दाब वाढून वेदना जाणवतात. काही लोकांना रात्री नाक बंद असणे, घोरणे किंवा स्लीप अॅप्नियामुळे योग्य झोप मिळत नाही. वारंवार रात्री मध्येच जाग येणे किंवा खूप उशिरापर्यंत मोबाईल वापरणेही झोपेचा चक्र बिघडवते. या सर्व गोष्टी सकाळी उठल्यावर डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतात.

स्ट्रेस, चिंताग्रस्तता आणि मानसिक ताण

जास्त मानसिक तणाव असलेल्या लोकांमध्ये सकाळी उठल्यावर डोकेदुखी अधिक प्रमाणात दिसते. दिवसभरातील चिंताग्रस्तता, कामाचा ताण, भावनिक अस्थिरता यामुळे झोपेतही मेंदू रिलॅक्स होत नाही. सतत विचार चालू असल्यामुळे मेंदूवर ताण येतो आणि सकाळी उठल्यावर डोक्यात जडपणा आणि वेदना जाणवतात. तणावामुळे शरीरातील सेरोटोनिन हार्मोन्सवरही परिणाम होतो, ज्यामुळे माइग्रेनसारख्या वेदना वाढू शकतात.

चुकीची स्लीप पोजिशन 

झोपताना चुकीची पोजिशन, उंच उशी वापरणे यामुळे मानेत ताण येतो आणि सकाळी डोकेदुखी निर्माण होते. अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता देखील वेदनेला कारणीभूत ठरते. रात्री पुरेसे पाणी न पिता झोपल्यास सकाळी डिहायड्रेशनमुळे मेंदूला आवश्यक द्रव मिळत नाही. त्यामुळेदेखील डोकं जड वाटू शकतं. काही लोक रात्री कॉफी, चहा किंवा अल्कोहोल घेतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि सकाळी वेदना वाढतात.

मायग्रेन आणि इतर आरोग्य समस्या

काही वेळा सकाळी होणारी डोकेदुखी ही माइग्रेनची लक्षणे असू शकतात. प्रकाश, आवाज किंवा काही विशिष्ट वासांमुळे माइग्रेन वाढतो आणि बहुतेक वेळा झोपेतून उठतानाच त्याचा त्रास जाणवतो. तसेच रक्तदाब वाढणे, ब्लड शुगर कमी होणे, सायनुसायटिस, किंवा दातांच्या ताणामुळेही सकाळी डोकेदुखी होऊ शकते. ही समस्या सतत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळची डोकेदुखी टाळण्यासाठी उपाय

– रोज ७-८ तासांची पुरेशी आणि नियमित झोप घ्या

– झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करा

– मेडिटेशन, डीप ब्रीदिंग किंवा हलका व्यायाम करून तणाव कमी करा

– दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि रात्री कॅफिन टाळा

– स्लीप पोजिशन दुरुस्त करा आणि योग्य उशी वापरा

– सतत वेदना असल्यास डॉक्टरांकडे तपासणी करा