Hair Fall in Winter : थंडीत केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे घरगुती उपाय
Hair Fall in Winter : हिवाळ्यात कोरडे हवामान आणि टाळूतील आर्द्रता कमी झाल्यामुळे केस गळती वाढते. नारळ तेल–कोरफड मिश्रण, मेथीचा मास्क, कांद्याचा रस हे घरगुती उपाय केसांच्या मुळांना मजबुती देतात.

केसळतीची समस्या
हिवाळ्यात हवामानातील कोरडेपणा, आर्द्रतेची कमतरता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यामुळे केस गळतीची समस्या अधिक जाणवते. थंड वाऱ्यामुळे टाळू कोरडे पडते, कोंडा वाढतो आणि त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. बऱ्याच वेळा योग्य आहार न घेणे, गरम पाण्याने केस धुणे किंवा जास्त वेळ ब्लो-ड्राय करणे यामुळेही केस गळती वाढते. त्यामुळे या काळात केसांची नैसर्गिक पद्धतीने योग्य काळजी घेणे अत्यावश्यक असते.
नारळ तेल आणि कोरफडीचा जेल
हिवाळ्यात केस गळती रोखण्यासाठी नारळ तेल आणि अॅलोवेरा जेल हा उत्तम उपाय आहे. नारळ तेलातील फॅटी अॅसिड्स केसांना आर्द्रता देतात, तर कोरफड टाळूतील दाह कमी करून केसांच्या मुळांना मजबुती देते. दोन चमचे नारळ तेलात एक चमचा अॅलोवेरा जेल मिसळून हलके गरम करा आणि टाळूवर मसाज करा. ३० मिनिटे ठेवून सौम्य शँम्पूने धुवा. आठवड्यातून २–३ वेळा हा उपाय केल्यास केस गळती मोठ्या प्रमाणात कमी होते.
मेथी दाणे
मेथीत प्रथिने, आयर्न आणि निकोटिनिक अॅसिड असते जे केसांची वाढ सुधारते. रात्री दोन चमचे मेथी पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ती वाटून पेस्ट तयार करा आणि टाळूवर लावा. ४० मिनिटांनी धुवा. मेथीचा हा मास्क मुळांना घट्ट करून केस गळणे कमी करतो. ज्यांच्या केसांमध्ये कोरडेपणा जास्त आहे त्यांनी या पेस्टमध्ये दही मिसळून लावल्यास उत्तम परिणाम मिळतात.
कांद्याचा रस
कांद्यामध्ये सल्फर भरपूर असते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कांद्याचा रस काढून टाळूवर हलक्या हाताने मसाज करा आणि १५–२० मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांची वाढ वेगाने होते आणि तुटणंही कमी होऊ लागतं. ज्यांना तीव्र वासामुळे त्रास होतो त्यांनी कांद्याच्या रसात गुलाबपाणी मिसळून वापरावे.
कोरड्या हवेतून केसांचे संरक्षण
हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुणे टाळा. खूप गरम पाणी केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकते आणि गळती वाढवते. केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा. आठवड्यातून फक्त २–३ वेळा केस धुवा. बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपीने केसांचे संरक्षण करा. याशिवाय पुरेशी झोप, प्रथिने आणि ओमेगा-३ असलेला आहार, पाणी पिण्याची सवय आणि ताण कमी ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

