गुगलसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांची लाईफस्टाईल कशी असेल, याची अनेकांना उत्सुकता असते. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून ते रोज सकाळी एकच नाश्ता करत आहेत.

मुंबई : गुगलसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांची लाईफस्टाईल कशी असेल, याची अनेकांना उत्सुकता असते. कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचे नेतृत्व करणारे पिचाई खाण्यापिण्याच्या आणि फिटनेसच्या बाबतीत मात्र खूप साधे आहेत. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून ते रोज सकाळी जवळपास एकच नाश्ता करत आहेत.

मग सुंदर पिचाई रोज सकाळी नाश्त्याला नक्की काय खातात? त्यांचे आवडते साऊथ इंडियन पदार्थ कोणते? एवढ्या बिझी शेड्युलमध्येही ते स्वतःला फिट कसं ठेवतात?

१५ वर्षांपासून नाश्त्याला तोच तोच मेन्यू 

'मिंट'च्या रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई गेल्या १५ वर्षांपासून रोज सकाळी जवळपास एकच नाश्ता करत आहेत. त्यांच्या नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड टोस्ट आणि एक कप चहा असतो. रोज सकाळी उठून काय खायचं याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, एकच नाश्ता करून वेळ वाचवणं हा त्यांचा उद्देश आहे. यामुळे त्यांना दिवसातल्या इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येतं.

सुंदर पिचाई यांच्यासाठी सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. या वेळेत त्यांना थोडं एकटं राहायला, विचार करायला आणि जगातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचायला आवडतं. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'सह इतर वर्तमानपत्रं वाचणं हा त्यांच्या सकाळच्या रुटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.

सकाळी लवकर उठतात, पण रात्री जास्त ॲक्टिव्ह!

सुंदर पिचाई साधारणपणे सकाळी ६.४५ ते ७.३० च्या दरम्यान उठतात. पण त्यांच्या रुटीनची आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, रात्री ९ नंतर त्यांना काम करण्याचा जास्त उत्साह येतो. रात्री १० नंतर आपण जास्त चांगलं आणि वेगाने काम करू शकतो, असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. असं असलं तरी, आरोग्याच्या दृष्टीने ते रोज किमान साडेसहा ते सात तास झोप घेण्याचा प्रयत्न करतात.

बंगळुरूत डोसा, तर दिल्लीत छोले भटुरे!

कामानिमित्त जगभर फिरणाऱ्या सुंदर पिचाई यांना भारतीय जेवण खूप आवडतं. युट्यूबर वरुण मय्या याच्यासोबत झालेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या आवडत्या भारतीय पदार्थांबद्दल सांगितलं होतं.

प्रत्येक शहरात त्यांचा एक आवडता पदार्थ ठरलेला आहे -

- बंगळुरू: सुंदर पिचाई यांना मसाला डोसा आणि इतर प्रकारचे डोसे खूप आवडतात.

- दिल्ली: दिल्लीत गेल्यावर ते आवर्जून छोले भटुरे खातात.

- मुंबई: मुंबईत आल्यावर त्यांची पहिली पसंती पावभाजीला असते.

यावरून त्यांना भारतीय पदार्थांची किती आवड आहे, हे दिसून येतं. त्यातही बंगळुरूचा डोसा हा त्यांच्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे.

बिझी शेड्युलमध्येही फिटनेसला प्राधान्य

गुगलसारख्या मोठ्या कंपनीची जबाबदारी सांभाळत असतानाही, सुंदर पिचाई वेळ काढून व्यायाम करतात. 'मिंट'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वर्कआऊट रुटीनबद्दल सांगितलं होतं. वीकेंडला ते न चुकता व्यायाम करतात. याशिवाय त्यांना वॉकिंग आणि हायकिंग करायलाही आवडतं.

आठवड्याच्या दिवसांमध्ये ते शुक्रवारी संध्याकाळी वर्कआऊट करतात. सोमवार ते गुरुवार कामाच्या गडबडीत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते व्यायाम करतात. रोज एकच व्यायाम करायला त्यांना आवडत नाही. कधी ते सायकलिंग करतात, तर कधी इतर ॲक्टिव्हिटीज करतात.

थोडक्यात सांगायचं तर, एवढं मोठं पद आणि कामाचं टेन्शन असूनही सुंदर पिचाई साधा आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामाला महत्त्व देतात. १५ वर्षांपासून एकच नाश्ता करण्याची त्यांची सवय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.