- Home
- lifestyle
- Expiry Date : पूर्वी नव्हती, मग आताच का आली? तारीख उलटली म्हणजे अन्न खरंच खराब होतं का?
Expiry Date : पूर्वी नव्हती, मग आताच का आली? तारीख उलटली म्हणजे अन्न खरंच खराब होतं का?
Expiry Date : ५० वर्षांपूर्वी अन्नाच्या पाकिटांवर 'एक्सपायरी डेट' नसायची. पण आता कंपन्या दह्यापासून प्रत्येक गोष्टीवर ही तारीख छापतात. लोक फक्त तारीख उलटून गेली म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं अन्न कचऱ्यात फेकतात.

पाकिटांवर तारखा कधीपासून येऊ लागल्या?
आपल्या पूर्वजांच्या काळात अन्नावर कोणतीही एक्सपायरी डेट नसायची. लोक दुधाचा वास घेऊन ते नासलंय की नाही हे ओळखायचे. अन्नाची चव, वास, रंग आणि पोत बघून ते खाण्यायोग्य आहे की नाही, हे लोक ठरवायचे. पण २० व्या शतकात परिस्थिती बदलली. अन्नाचा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाढला. दुकानांमध्ये अन्न कित्येक दिवस पडून राहू लागलं. कंपन्यांनी लाखो लोकांसाठी अन्न पॅक करून विकायला सुरुवात केली. त्यामुळे हे अन्न किती काळ चांगलं राहील? ते किती दिवस साठवता येईल? हे ग्राहकांना सांगणं गरजेचं बनलं. तसेच, अन्न बनवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तारखांचा वापर सुरू केला. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पाकिटावर छापलेली प्रत्येक तारीख 'यानंतर अन्न विषारी होईल' असं सांगत नाही.

बेस्ट बिफोर, युज बाय आणि सेल बायमध्ये काय फरक आहे?
पाकिटावर दिसणाऱ्या तारखांचा अर्थ अनेकांना गोंधळात टाकतो. 'बेस्ट बिफोर', 'युज बाय' आणि 'सेल बाय' या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात.
Best Before (बेस्ट बिफोर):
ही तारीख प्रामुख्याने अन्नाच्या दर्जाशी संबंधित असते. ही तारीख उलटून गेल्यावर अन्नाची चव, वास किंवा ताजेपणा थोडा कमी होऊ शकतो. पण तुम्ही ते योग्य प्रकारे साठवून ठेवलं असेल, तर काही पदार्थ या तारखेनंतरही खाण्यायोग्य असतात.
Use By (युज बाय):
या तारखेकडे मात्र तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. लवकर खराब होणारं मांस, मासे आणि काही दुग्धजन्य पदार्थांसाठी ही तारीख महत्त्वाची असते. ही तारीख उलटून गेल्यावर त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.
Sell By (सेल बाय):
ही तारीख बहुतांश दुकानांसाठी असते. एखादं उत्पादन दुकानात किती काळ ठेवावं, याची ही सूचना असते. या तारखेनंतर ग्राहकाने ते अन्न खाल्लं तर धोका आहे, असा याचा अर्थ अजिबात होत नाही. म्हणूनच पाकिटावर तारीख दिसली की ते 'एक्सपायर' झालंय, असं समजणं चुकीचं आहे. त्या तारखेचा नेमका अर्थ काय, हे आधी समजून घ्या.
कंपन्या या तारखा कशा ठरवतात?
एखादं उत्पादन किती काळ चांगलं राहील, हे तपासण्यासाठी अन्न बनवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या चाचण्या करतात. तापमान, पॅकेजिंग, साठवण्याची पद्धत आणि किती काळानंतर चव किंवा पोत बदलेल, या गोष्टींचा त्या अभ्यास करतात. या चाचण्यांच्या आधारे त्या एक तारीख ठरवतात. बऱ्याचदा या तारखेचा अर्थ 'अन्न खराब होण्याचा शेवटचा दिवस' असा नसतो. त्या तारखेपर्यंत उत्पादनाचा दर्जा उत्तम राहील, अशी हमी कंपनी देते. कायदेशीर आणि ग्राहकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही कंपन्या ही तारीख थोडी आधीच ठरवतात. त्यामुळे पाकिटावरची तारीख उलटून गेली म्हणजे अन्न लगेच खराब झालं, असं होत नाही. विशेषतः व्यवस्थित पॅक केलेले, ओलावा न लागलेले आणि योग्य तापमानात ठेवलेले कॅनबंद पदार्थ, तांदूळ, पास्ता, काही ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट्स जास्त काळ टिकू शकतात. पण वेळेनुसार त्यांचा दर्जा थोडा कमी होऊ शकतो.
कोणत्या पदार्थांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे?
आपण सगळ्याच पदार्थांकडे एकाच नजरेने बघू शकत नाही. लवकर खराब होणाऱ्या पदार्थांच्या बाबतीत पाकिटावरच्या तारखेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. विशेषतः ताजं मांस, मासे आणि पाश्चराइज न केलेले दुग्धजन्य पदार्थ साठवण्याची पद्धत आणि तापमान खूप महत्त्वाचं असतं. यात हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. दुसरीकडे, पास्ता, काही सुके पदार्थ, चॉकलेट आणि कॅनबंद पदार्थांची चव, वास आणि पोत वेळेनुसार बदलू शकतो. पण फक्त तारीख उलटून गेली म्हणून ते लगेच धोकादायक बनतात, असं आपण म्हणू शकत नाही. अन्न तपासताना त्याचा वास, रंग, पोत आणि पाकीट फुगलंय की फाटलंय, या गोष्टींकडेही लक्ष द्या. जर तुम्हाला थोडी जरी शंका आली, तर ते न खाल्लेलंच बरं. विशेषतः लहान मुलं, वृद्ध, गरोदर महिला किंवा आजारी व्यक्तींच्या बाबतीत अन्नाच्या सुरक्षेची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
Expiry Date उलटून गेल्यावर अन्न लगेच फेकून द्यावं का?
पाकिटावर एखादी तारीख दिसली की अन्न विषारी झालंय, असं समजणं चुकीचं आहे. पण त्याच वेळी सगळ्याच एक्सपायरी डेट्सकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. ती तारीख कोणत्या प्रकारची आहे? तुम्ही अन्न कसं साठवलंय? पाकीट व्यवस्थित आहे का? अन्नाचा वास, रंग आणि पोत बदललाय का? या गोष्टीही तुम्ही पाहिल्या पाहिजेत. म्हणजेच पाकिटावरची तारीख फक्त एक मार्गदर्शक असते. ती अन्न विषारी बनवणारी 'ऑन-ऑफ स्विच' नाही. पण लवकर खराब होणाऱ्या पदार्थांच्या बाबतीत सुरक्षेशी संबंधित तारखांकडे दुर्लक्ष करू नका.
ही गोष्ट समजून घेतली तर आपण अन्नाची नासाडी थांबवू शकतो. त्याच वेळी खरोखरच धोकादायक असलेल्या पदार्थांच्या बाबतीत आपण सावध राहू शकतो. त्यामुळे यापुढे अन्नाच्या पाकिटावर तारीख दिसली की घाबरून जाऊ नका. त्या तारखेचा अर्थ समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. सोप्या भाषेत सांगायचं तर.. 'तारीख उलटून गेली' म्हणजे प्रत्येक वेळी 'अन्न खराब झालंय' असं होत नाही. तसेच 'वास चांगला येतोय' म्हणजे प्रत्येक वेळी ते 'सुरक्षित' आहे, असंही नाही. अन्नाचा प्रकार, साठवण्याची पद्धत आणि तारखेचा प्रकार या सगळ्या गोष्टी एकत्र करूनच निर्णय घ्या.