Menopause Diet : वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या आहारात प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स वाढवणं गरजेचं ठरतं. या वयानंतर महिलांनी त्यांच्या जेवणात कोणते बदल करायला हवेत, जेणेकरून शरीर फिट, ॲक्टिव्ह आणि निरोगी राहील, हे जाणून घेऊया.
Menopause Diet : वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. विशेषतः चाळीशी ओलांडल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे केवळ मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) मंदावत नाही, तर हाडंही कमजोर होऊ लागतात. अनेक महिलांचं वजनही वाढू लागतं. अशा परिस्थितीत, फक्त पोट भरण्यासाठी खाण्याऐवजी, आपल्या ताटात काय आहे याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य आहार केवळ शरीरच फिट ठेवत नाही, तर त्वचा, केस आणि एनर्जी लेव्हलही चांगली ठेवतो. चला तर मग जाणून घेऊया, चाळीशीनंतर महिलांनी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा.
जेवणात प्रोटीनचं प्रमाण वाढवा
चाळीशीनंतर महिलांनी आपल्या जेवणाच्या ताटात प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. प्रोटीनमुळे शरीरातील स्नायूंची झीज कमी होण्यास मदत होते. जेवणात डाळ, पनीर, अंडी, सोयाबीन, चणे, राजमा आणि दही यांसारख्या गोष्टींचा नक्की समावेश करा. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्या.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं
चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते. यामुळे केवळ हाडं कमकुवत होत नाहीत, तर थकवाही जाणवतो. आहारात दूध, दही, पनीर, राजमा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करा. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी साठी सकाळी १० ते १५ मिनिटं कोवळ्या उन्हात बसणं फायदेशीर ठरतं.
फायबरयुक्त जेवण
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा वजन वाढणे यांसारख्या समस्या सामान्य होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या ताटात सॅलड, फळं, मल्टीग्रेन चपाती आणि भाज्यांचा नक्की समावेश करा. फायबरमुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि पचनक्रियाही सुधारते.
हेल्दी फॅट्सकडे दुर्लक्ष करू नका
वाढत्या वयानुसार फॅट्स (चरबी) खाणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे, असं तुम्हालाही वाटत असेल, तर तुम्ही चुकताय. काही फॅट्स शरीरासाठी हेल्दी असतात. बदाम, अक्रोड, जवसाच्या बिया आणि मर्यादित प्रमाणात तुपाचं सेवन करायला हवं. हे हेल्दी फॅट्स केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
वाढत्या वयाबरोबर डिहायड्रेशनची (शरीरात पाण्याची कमतरता) समस्या लवकर उद्भवू शकते. त्यामुळे दिवसभरात पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. एकदम खूप पाणी पिण्याऐवजी, दिवसभरात थोडं-थोडं पाणी पित राहा. असं केल्याने शरीर केवळ हायड्रेटेड राहणार नाही, तर त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतील.


