- Home
- lifestyle
- Coconut Breaking Tips : नारळ कसा फोडायचा? सोप्या पद्धतीने दोन तुकडे करण्यासाठी ही ट्रिक वापरा
Coconut Breaking Tips : नारळ कसा फोडायचा? सोप्या पद्धतीने दोन तुकडे करण्यासाठी ही ट्रिक वापरा
नारळ फोडताना अनेकांची दमछाक होते. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही अगदी सहजपणे नारळाचे दोन अचूक तुकडे करू शकता.

नारळ कसा फोडायचा?
नारळ हा आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पूजेत देवाला नारळ वाहण्याची परंपरा आहे, तर स्वयंपाकातही आपण खोबरं आणि नारळाच्या दुधाचा भरपूर वापर करतो. पण नारळ वापरण्यापूर्वी सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे त्याचं कडक कवच फोडण्याची. नारळ सहजासहजी फुटत नसल्याने अनेकांना, विशेषतः महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो.
पण नारळ फोडण्यासाठी प्रत्येक वेळी मोठा दगड किंवा हातोडीची गरज नसते. तुम्ही नारळाचा नैसर्गिक आकार आणि त्यावर असलेल्या रेषा ओळखून योग्य ठिकाणी दाब दिल्यास, त्याचे सहज दोन तुकडे करू शकता. हे कसं करायचं ते आता आपण जाणून घेऊया.

नारळ सहज फोडण्याच्या टिप्स...
तुम्ही नारळाचे बारकाईने निरीक्षण केल्यास, त्याच्या कवचावर तीन नैसर्गिक रेषा दिसतील. या रेषा नारळाला तीन भागात विभागतात. यातील एक भाग थोडा रुंद असतो, तर उरलेले दोन भाग तुलनेने लहान असतात. नारळ सहज फोडण्यासाठी सर्वात आधी ही नैसर्गिक रचना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
नारळ हातात धरताना तो उभा न धरता आडवा धरावा. दोन लहान भाग खाली आणि थोडा मोठा भाग वरच्या बाजूला ठेवल्यास, कुठे फटका मारायचा हे ओळखणे सोपे जाते.
नारळ फोडण्यासाठी थोडी जड आणि हातात घट्ट पकडता येईल अशी वस्तू वापरा. नारळ फोडताना हाताला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. एका हातात नारळ आडवा धरा आणि दुसऱ्या हातात जड वस्तू घ्या.
आता नारळाच्या मध्यभागी दिसणाऱ्या नैसर्गिक रेषेवर दोन वेळा नियंत्रित आणि जोरात फटका मारा. रेषेवर अचूक फटका बसल्यास कवचाला तडा जाईल. यावेळी आतील पाणी बाहेर येऊ शकते, त्यामुळे आधीच एक वाटी तयार ठेवा आणि त्यात पाणी काढून घ्या.
तडा गेल्यानंतर असे करा
नारळाला तडा गेल्यानंतर त्यावर जोरात फटके मारणे थांबवा. सर्वात आधी नारळातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. त्यानंतर तडा गेलेल्या भागावर हलक्या हाताने पुन्हा फटका मारल्यास नारळाचे सहज दोन भाग होतील.
अशा प्रकारे नारळाची नैसर्गिक रचना लक्षात घेऊन आणि मधल्या रेषेवर फटका मारून तुम्ही कोणतीही मेहनत न घेता नारळ फोडू शकता. हातात धरून नारळ फोडताना तो निसटण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे काम शक्यतो सुरक्षित आणि स्थिर ठिकाणी करा. लहान मुलांनी हे काम मोठ्यांच्या देखरेखीखालीच करावे.
घरी नारळ फोडणे कठीण वाटणाऱ्यांसाठी ही ट्रिक खूप फायदेशीर आहे. मंदिरात नारळ फोडण्यासाठी खास सोय असते, त्यामुळे तिथे अशा ट्रिक्सची गरज भासत नाही.

