एरवी सामोसा मैद्याचा असतो, पण गव्हाच्या पिठाचा वापर करूनही तितकाच कुरकुरीत कांदा सामोसा बनवता येतो. यासाठी एक खास ट्रिक वापरल्यास सामोसे बराच वेळ कुरकुरीत राहतात.
साधारणपणे सामोसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मैद्याचा सामोसा. पण आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी गव्हाच्या पिठापासूनही तितकाच चविष्ट आणि कुरकुरीत सामोसा बनवता येतो. इथे सांगितलेली एक छोटीशी ट्रिक वापरली, तर हॉटेलसारखे सामोसे तुम्ही घरी सहज बनवू शकाल.
काय काय साहित्य लागेल? (Ingredients)
पीठ मळण्यासाठी
गव्हाचं पीठ: 2 कप
उपमा रवा (बारीक रवा): 2 टीस्पून (यामुळे सामोसे जास्त कुरकुरीत होतात)
तूप किंवा तेल: 1 टेबलस्पून
मीठ: चवीनुसार
सारणासाठी (मसाला)
कांदा: 1 कप (बारीक चिरलेला)
पोहे: पाव कप (हे कांद्यातील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे सामोसे मऊ पडत नाहीत)
हिरवी मिरची: 2-3
लाल तिखट: अर्धा टीस्पून
धणे पूड: 1 टीस्पून
जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला: प्रत्येकी अर्धा टीस्पून
हळद आणि कोथिंबीर
कसे बनवायचे (Step-by-Step)
*एका भांड्यात गव्हाचं पीठ, रवा, मीठ आणि तूप घालून चांगलं मिक्स करा. मग थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.
*एका बाऊलमध्ये कांदा आणि पोहे एकत्र करून हाताने चांगले चुरून घ्या. पोहे घातल्यामुळे कांद्याला सुटणारं पाणी शोषलं जातं आणि सामोसे तळताना मऊ पडत नाहीत. यानंतर बाकीचे सर्व मसाले घालून मिक्स करा आणि ५ मिनिटं बाजूला ठेवा.
सामोसा पट्टी बनवण्याच्या दोन पद्धती
पहिली पद्धत (सोपी पद्धत): पोळी जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटा. तिच्या कडा कापून आयताकृती पट्ट्या तयार करा. यात मसाला भरून सामोस्याचा आकार द्या.
दुसरी पद्धत (हॉटेल स्टाईल): पातळ लाटलेली पोळी तव्यावर दोन्ही बाजूंनी फक्त ३० सेकंद हलकीशी भाजून घ्या (पूर्ण शिजवायची नाही). त्यानंतर पट्ट्या कापून मसाला भरा. या पद्धतीने सामोसे जास्त वेळ कुरकुरीत राहतात. सामोसा तेलात सुटू नये यासाठी गव्हाच्या पिठात थोडं पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा आणि त्याने सामोस्याच्या कडा चिकटवा.
कसे तळायचे?
कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापल्यावर गॅसची फ्लेम मध्यम किंवा मंद ठेवा. सामोसे तेलात सोडून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. गॅस मोठा ठेवल्यास सामोसे मऊ पडतात, त्यामुळे शांतपणे तळणं महत्त्वाचं आहे.
न्यूजपेपर वापरू नका
सामोसे तळून झाल्यावर थेट वर्तमानपत्रावर (Newspaper) ठेवू नका. त्याऐवजी एका चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर ठेवा. चाळणीवर ठेवल्याने हवा खेळती राहते आणि सामोसे मऊ पडत नाहीत.

