- Home
- lifestyle
- Milk Benefits : गाईचं दूध की म्हशीचं दूध? आरोग्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर, जाणून घ्या
Milk Benefits : गाईचं दूध की म्हशीचं दूध? आरोग्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर, जाणून घ्या
Cow Milk vs Buffalo Milk : रोज दूध पिणाऱ्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की गाईचं दूध चांगलं की म्हशीचं. यापैकी कशात जास्त पोषक घटक असतात, कोणतं दूध लवकर पचतं आणि कोणासाठी कोणतं दूध उत्तम आहे?
कोणतं दूध जास्त पौष्टिक?
सकाळी उठल्यावर एक ग्लास दूध पिणं हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या दिनचर्येचा भाग आहे. पण बाजारात मिळणाऱ्या गाईच्या आणि म्हशीच्या दुधापैकी कोणतं जास्त पौष्टिक आहे? कोणतं दूध प्यायल्याने पोट हलकं राहतं? हा प्रश्न अनेकांना पडतो. खरंतर दोन्ही दुधात शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. पण त्यात असलेल्या फॅट, प्रोटीन, कॅल्शियम आणि कॅलरीजच्या प्रमाणामुळे त्यांच्या पचनावरही परिणाम होतो.

गाईचं दूध: पचायला हलकं आणि वजन नियंत्रणासाठी योग्य
म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गाईच्या दुधात फॅट आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते प्यायला हलकं असतं. यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक मिळतात. ज्यांना वजन कमी करायचंय किंवा वजन नियंत्रणात ठेवायचंय त्यांच्यासाठी गाईचं दूध हा उत्तम पर्याय आहे.
म्हशीचं दूध: फॅट, प्रोटीन आणि एनर्जी जास्त
म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असल्याने ते घट्ट आणि क्रीमी असतं. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात प्रोटीन, कॅल्शियम आणि कॅलरीज साधारणपणे जास्त असतात. शरीराला जास्त ऊर्जा आणि पोषक घटकांची गरज असणारे लोक मर्यादित प्रमाणात म्हशीच्या दुधाचं सेवन करू शकतात. दही, पनीर आणि तूप बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचा जास्त वापर होतो.
कोणतं दूध लवकर पचतं?
पचनाचा विचार केल्यास, फॅट कमी असल्याने गाईचं दूध लवकर आणि सहज पचतं. म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीन जास्त असल्याने ते पचायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण प्रत्येकाची पचनशक्ती सारखी नसते. दूध प्यायल्यानंतर पोट फुगणं, गॅस किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ते 'लॅक्टोज इनटॉलरन्स'चं (Lactose Intolerance) लक्षण असू शकतं.
मुलांसाठी कोणतं दूध चांगलं?
मुलांना दूध देताना पालकांनी पोषक घटकांसोबतच त्यांचं वय आणि पचनशक्तीही लक्षात घ्यायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एका वर्षाच्या आतील मुलांना गाईचं किंवा म्हशीचं साधं दूध मुख्य पेय म्हणून देऊ नये. या वयात फक्त आईचं दूध किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला दूध द्यावं.
कोणतं दूध उत्तम? काय आहे सल्ला?
ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचं आहे आणि हलका आहार घ्यायचा आहे ते गाईचं दूध निवडू शकतात, तर ज्यांना जास्त ऊर्जा आणि कॅलरीजची गरज आहे ते मर्यादित प्रमाणात म्हशीचं दूध पिऊ शकतात. थोडक्यात दोन्ही दूध पौष्टिक असतात, फक्त शुद्ध आणि सुरक्षितपणे प्रक्रिया केलेलंच दूध प्यावं.
(टीप: प्राण्यांची जात आणि त्यांच्या आहारावर दुधाचे पोषक घटक अवलंबून असतात. दुधाची ॲलर्जी किंवा पचनाची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम).

