- Home
- lifestyle
- History of Clocks : घड्याळात 60 मिनिटं, 60 सेकंदच का? 100 का नाही? यामागे लपलंय 4000 वर्षांपूर्वीचं रहस्य
History of Clocks : घड्याळात 60 मिनिटं, 60 सेकंदच का? 100 का नाही? यामागे लपलंय 4000 वर्षांपूर्वीचं रहस्य
History of Clocks: वेळ पाहताना तुमच्याही मनात हा प्रश्न कधीतरी नक्कीच आला असेल. १ तासात ६० मिनिटं आणि १ मिनिटात ६० सेकंदच का? वेळ १०० मिनिटं किंवा १०० सेकंदांमध्ये का नाही विभागली गेली?

घड्याळात ६० मिनिटं, ६० सेकंदच का? १०० का नाही?
साधारणपणे आपण सर्वच मोजमापांसाठी १०, १०० आणि १००० या आकड्यांचा वापर करतो. पण घड्याळाचा विषय येतो तेव्हा मात्र ६० मिनिटं आणि ६० सेकंदांची पद्धत का वापरली जाते? याचं कारण काय? ही पद्धत कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का?

४,००० वर्षांपूर्वीचा इतिहास
इतिहासकारांच्या मते, ६० च्या आधारावर वेळ मोजण्याची पद्धत बॅबिलोनियन संस्कृतीतून आली आहे. आज आपण १० च्या आधारावर 'डेसिमल सिस्टीम' (दशांश पद्धत) वापरतो. पण सुमारे ४,००० वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोक 'सेक्साजेसिमल' (Sexagesimal) म्हणजेच ६० वर आधारित संख्या पद्धत वापरत होते.
६० हा आकडाच का निवडला गेला?
बॅबिलोनियन्सनी ६० हा आकडा निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला अनेक आकड्यांनी सहज भागता येतं. उदाहरणार्थ, जर एखाद्या गोष्टीचे अर्धे, एक तृतीयांश, एक चतुर्थांश किंवा एक पंचमांश असे भाग करायचे असतील, तर ६० च्या हिशोबाने ते खूप सोपं जातं.
एका तासात ६० मिनिटांची पद्धत कशी आली?
वेळेला तास, मिनिटं आणि सेकंदांमध्ये विभागण्याची पद्धत एकाच वेळी सुरू झाली नाही. प्राचीन इजिप्तमध्ये दिवस आणि रात्रीला प्रत्येकी १२ भागांत विभागण्याची पद्धत होती. यातूनच २४ तासांच्या दिवसाची संकल्पना जन्माला आली. त्यानंतर बॅबिलोनियन्सची ६० ची संख्या पद्धतही यात जोडली गेली आणि वेळेचं मोजमाप तयार झालं.
मग एका तासाची १०० मिनिटं का नाही केली?
आज बहुतांश मोजमापांसाठी १० चा आधार वापरला जात असला तरी, एका तासाची १०० मिनिटं करणं तितकंसं सोयीचं नव्हतं. पण ६० ला मिनिटांमध्ये विभागणं सोपं होतं. उदाहरणार्थ, एका तासाचे अर्धे भाग केले तर ३० मिनिटं, तीन भाग केले तर २० मिनिटं आणि चार भाग केले तर १५ मिनिटं मिळतात. पण १०० मिनिटांच्या पद्धतीत अशी सोपी विभागणी शक्य नव्हती.
पूर्वीच्या घड्याळांमध्येही मिनिटं आणि सेकंद दिसायचे का?
आजच्या घड्याळांमध्ये तास, मिनिटं आणि सेकंद आपण सहज पाहू शकतो. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. सुरुवातीच्या मेकॅनिकल घड्याळांमध्ये फक्त तास दाखवणारा एकच काटा असायचा. साधारण १४ व्या शतकात युरोपमध्ये मेकॅनिकल घड्याळांचा वापर सुरू झाला. त्यानंतर १६ व्या शतकापर्यंत मिनिटं दाखवणाऱ्या काट्याचाही वापर वाढू लागला.
