आपण अनेकदा फ्रिजच्या दारात दूध, अंडी आणि इतर अनेक गोष्टी ठेवतो. पण फ्रिजचं दार सतत उघड-बंद होत असल्यामुळे तिथलं तापमान स्थिर राहत नाही. त्यामुळे काही पदार्थ तिथे ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात. फ्रिजच्या दारात नक्की काय ठेवू नये, हे जाणून घ्या.
मुंबई : फ्रिजमध्ये वस्तू ठेवण्याची एक योग्य पद्धत असते. आपण सोयीसाठी दूध, अंडी, सॉस आणि इतर अनेक पदार्थ फ्रिजच्या दाराला असलेल्या रॅकमध्ये ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की फ्रिजच्या दाराचं तापमान आतल्या भागापेक्षा जास्त असतं. दार सतत उघड-बंद होत असल्यामुळे इथलं तापमान स्थिर राहत नाही. त्यामुळे, काही विशिष्ट वस्तू तिथे ठेवल्यास त्यांचा दर्जा आणि ताजेपणा कमी होऊ शकतो. चला तर मग पाहूया, फ्रिजच्या दारात नक्की काय ठेवू नये.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ठेवू नका
फ्रिजच्या दारातील रॅकमध्ये दूध ठेवणं टाळावं. दार सतत उघडल्यामुळे तापमानात सतत बदल होतो. याचा परिणाम दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या टिकण्यावर होऊ शकतो. त्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. दूध नेहमी फ्रिजमध्ये आतल्या शेल्फवर ठेवणं उत्तम.
अंडी ठेवण्यासाठी ही जागा योग्य नाही
अनेक फ्रिजमध्ये अंडी ठेवण्यासाठी दाराला खास जागा दिलेली असते. पण याचा अर्थ असा नाही की ती जागा अंडी ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. दार उघडल्यावर कूलिंगमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम अंड्यांच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. अंडी त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच फ्रिजच्या आतल्या शेल्फवर ठेवणं सर्वात चांगलं.
चिरलेल्या भाज्या आणि फळं
आधीच कापून ठेवलेली फळं आणि भाज्या लवकर खराब होऊ शकतात. त्यांना दारात ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये आतल्या बाजूला हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे तापमानातल्या सततच्या बदलांपासून त्यांचं संरक्षण होतं. शक्यतोवर, भाज्या आणि फळं आयत्या वेळी कापून वापरावीत.
शिळं अन्न ठेवू नका
शिळं किंवा आधीच शिजवलेलं अन्न फ्रिजच्या दारात ठेवू नका. विशेषतः जर ते जास्त काळ टिकवायचं असेल, तर ते फ्रिजच्या आतल्या शेल्फवर हवाबंद डब्यात ठेवा.
मांस आणि सी-फूड
कच्चं मांस, चिकन किंवा सी-फूड तर फ्रिजच्या दारात चुकूनही ठेवू नये. हे पदार्थ खूप लवकर खराब होतात आणि त्यांना सतत थंड तापमानाची गरज असते. त्यांना व्यवस्थित पॅक करून फ्रिजच्या सर्वात थंड भागात ठेवणं गरजेचं आहे.
औषधं दारात ठेवू नका
काही औषधांना विशिष्ट तापमानात ठेवावं लागतं. त्यांच्या पॅकेटवर दिलेल्या सूचना वाचूनच ती फ्रिजमध्ये ठेवा. या सूचना न पाळता औषधं फ्रिजच्या दारात ठेवणं योग्य नाही.
मग फ्रिजच्या दारात काय ठेवावं?
ज्या वस्तूंवर तापमानातील बदलांचा फारसा परिणाम होत नाही, अशा वस्तू तुम्ही फ्रिजच्या दारात ठेवू शकता. उदाहरणार्थ, सॉस, जॅम, लोणची, मोहरी, काही प्रकारची शीतपेयं आणि पॅक केलेले पदार्थ. या गोष्टींसाठी फ्रिजच्या दारातील रॅक उत्तम आहेत.


