- Home
- lifestyle
- Black Thread : काळा धागा पुरुष उजव्या, तर महिला डाव्या पायात का बांधतात? काय आहे यामागे मान्यता, श्रद्धा?
Black Thread : काळा धागा पुरुष उजव्या, तर महिला डाव्या पायात का बांधतात? काय आहे यामागे मान्यता, श्रद्धा?
पायात काळा धागा बांधणं ही केवळ फॅशन आहे की यामागे काही आध्यात्मिक महत्त्व दडलंय? काळा धागा कालभैरवाशी संबंधित मानला जातो. काही पारंपरिक मान्यतांनुसार, हा धागा नऊ गाठी मारून बांधायला हवा.

पायात काळा धागा का बांधतात?
भारतात अनेक पिढ्यांपासून पायात काळा धागा बांधण्याची परंपरा पाळली जाते. काही जण केवळ फॅशन म्हणून हा धागा बांधतात. तर, आध्यात्मिक मान्यतांनुसार काळा रंग वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करतो. सतत थकवा येणं, आरोग्याच्या समस्या आणि कामात येणारे अडथळे यांचा संबंध लोक वाईट नजरेसोबत जोडतात. त्यामुळे लोक काळा धागा बांधतात. अर्थात, यामुळे आरोग्याच्या समस्या सुटतात, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

कालभैरव आणि नवग्रहांशी असलेला संबंध
काशीसारख्या काही आध्यात्मिक ठिकाणी काळ्या धाग्याला कालभैरवाचे रक्षणकर्ते प्रतीक मानले जाते. काही जण याला काशी दारा असंही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे वाईट परिणाम कमी करण्यासाठीही काळा धागा वापरतात. विशेषतः शनीचा प्रभाव पायांवर पडतो, अशी काही ज्योतिषांची मान्यता आहे. त्यामुळे पायात काळा धागा बांधल्याने आध्यात्मिक संरक्षण मिळते, असा समज आहे.
नऊ गाठी मारण्याचे महत्त्व
काळा धागा बांधताना त्याला नऊ गाठी मारणे काही पारंपरिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. या नऊ गाठी मानवी शरीरातील नऊ द्वारांचे प्रतिनिधित्व करतात, असे आध्यात्मिक स्पष्टीकरण दिले जाते. धागा बांधताना चांगल्या भावना आणि देवावर श्रद्धा असणे गरजेचे आहे. मात्र, नऊ गाठी मारणे सर्वच ठिकाणी सक्तीचे नसते. कुटुंबाच्या चालीरीती आणि आध्यात्मिक परंपरेनुसार या पद्धतीत बदल होऊ शकतो.
पुरुष आणि महिलांनी कोणत्या पायात धागा बांधावा?
काही मान्यतांनुसार, पुरुष आणि लहान मुलांनी उजव्या पायात, तर महिला आणि मुलींनी डाव्या पायात काळा धागा बांधण्याची प्रथा आहे. काही कुटुंबे लहान मुलांच्या बाबतीतही याच पद्धतीचा अवलंब करतात. शिवाय, शनिवारी संध्याकाळी काळा धागा बांधणे शुभ मानले जाते. धागा बांधताना तो जास्त घट्ट नसावा, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. या केवळ पारंपरिक मान्यता असून प्रत्येकालाच त्या लागू पडतात असे नाही.
चांदीच्या पैंजणासोबत काळा धागा का बांधतात?
काही महिला आणि मुली काळ्या धाग्यासोबत चांदीचे पैंजण किंवा पायराइट खडे असलेले दागिनेही घालतात. पारंपरिक मान्यतांनुसार, यामुळे वाईट नजर लागत नाही आणि घरात सुख-समृद्धी व सकारात्मक ऊर्जा वाढते. पण, असे दागिने घातल्याने संपत्ती वाढते किंवा ग्रहांचे दोष दूर होतात, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे काळा धागा बांधण्याचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धा आणि परंपरेवर अवलंबून असतो.