बंगळुरूमध्ये महिन्याला ३ लाख रुपये कमवणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाला लग्नासाठी मुली मिळत नसल्याची चर्चा एक्सवर रंगली आहे. गलेलठ्ठ पगार असूनही मुली त्याला नकार देत आहेत.
बंगळुरू : एका व्हायरल पोस्टने एक्सवर (X) अरेंज्ड मॅरेजबाबत मोठी चर्चा घडवून आणली आहे. एका युजरने दावा केलाय की, त्याचा ३१ वर्षांचा मित्र बंगळुरूमध्ये स्विगी (Swiggy) कंपनीत काम करतो. तो महिन्याला तब्बल ३ लाख रुपये कमवतो. तरीही त्याला लग्नासाठी मुलींकडून सतत नकार मिळत आहे. @Ajinkya Revdikar या एक्स युजरने ही पोस्ट शेअर केली असून, त्याने अरेंज्ड मॅरेजला थेट 'स्कॅम' म्हटलंय. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचा मित्र ५ फूट ९ इंच उंच आहे, दिसायला चांगला आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो स्वतःसाठी मुलगी शोधत आहे.
या तरुणाची नोकरी सुरक्षित आहे आणि पगारही तगडा आहे. तरीही अनेक मुलींनी त्याला रिजेक्ट केलंय. विशेष म्हणजे, महिन्याला ५० हजार रुपये कमवणाऱ्या मुलींनीही त्याला नकार दिलाय.
या पोस्टमध्ये त्या तरुणाचं आणि एका मुलीचं व्हॉट्सॲप चॅटही शेअर करण्यात आलंय. या चॅटमध्ये ती मुलगी त्याला नम्रपणे नकार देताना दिसतेय. तिने लिहिलंय, "होय. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. त्यामुळे आपलं फारसं जमणार नाही. आपण हा विषय इथेच थांबवूया. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!"
हा स्क्रीनशॉट आणि तरुणाला मिळणाऱ्या नकाराची कहाणी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींच्या मते, फक्त चांगला पगार आणि नोकरी असली म्हणजे लग्नात सगळं जुळून येईलच असं नाही. तर काहींनी थेट अरेंज्ड मॅरेजच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
एका युजरने विचारलं की, एवढा चांगला पगार असणारा आणि बंगळुरूसारख्या शहरात राहणारा तरुण अरेंज्ड मॅरेजच्या भानगडीत का पडतोय? त्याने लिहिलं, "मला अरेंज्ड मॅरेजचा कन्सेप्टच समजत नाही. जर तुम्ही एवढे पैसे कमवता आणि बंगळुरूसारख्या भारी शहरात राहता, तर तुम्ही डेटिंग करून लग्न का करत नाही?"
दुसऱ्या एका युजरने आपली व्यथा मांडताना लिहिलं, "मी गेल्या एका वर्षापासून अरेंज्ड मॅरेजसाठी मुलगी शोधतोय. तुझ्या मित्राची जी अवस्था आहे, तीच माझीही आहे. मला नकार मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे 'आपले विचार जुळत नाहीत' किंवा 'आपली जोडी शोभणार नाही' हेच असतं."
मात्र, जास्त पगार असल्यावर लग्नाच्या बाजारात भाव मिळतोच, या विचाराला अनेक युजर्सनी विरोध केला. एकाने लिहिलं, "जास्त पगार म्हणजे लग्नाची गॅरंटी नाही, तुमचा स्वभावही महत्त्वाचा असतो." तर दुसऱ्या एकाने थेट टीका करत म्हटलं, "त्या मुलीने योग्यच निर्णय घेतला, कारण तुझ्याकडे ऑफर करण्यासाठी पैशांशिवाय दुसरं काहीच नाहीये."

