Be careful : आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पण ही काळजी घेता घेता त्याचा अतिरेक होणार नाही, हे देखील पाहिले पाहिजे. जास्त व्यायाम केल्याने शरीरात कोणत्या समस्या उद्भवू शकतात, याबद्दल येथे जाणून घेऊया.

Be careful : शरीर तंदरुस्त ठेवण्यासाठी दररोज सकस आहार आणि तोही वेळच्या वेळी, पुरेश झोप आणि नियमितपणे योग किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, महानगरांमध्ये राहणाऱ्यांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे या सर्वांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. मात्र, अनेकजण योग किंवा व्यायाम करत असतात. तथापि, हे करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे. कारण, योग आणि व्यायाम संयमाने केला पाहिजे. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो. 

दररोज व्यायाम करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास फायद्याऐवजी नुकसानच होते. व्यायामाचे अनेक फायदे असले तरी, तो गरजेपेक्षा जास्त केल्यास शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त व्यायाम केल्याने शरीरात कोणत्या समस्या उद्भवतात, ते या लेखात पाहूया.

अतिव्यायामाचे प्रकार

1. ओव्हरट्रेनिंग (Overtraining)

हा एक दीर्घकाळ केला जाणारा अतिव्यायाम आहे. यामुळे जास्त थकवा, स्नायू दुखणे आणि निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवतात.

2. ओव्हर-एक्सरसाइझिंग (Over-exercising)

कमी कालावधीत खूप जास्त तीव्रतेने केलेला व्यायाम. यामुळे स्नायूंना इजा आणि हृदयविकारासारखे धोकादायक आजार होऊ शकतात.

जास्त व्यायाम करण्याचे दुष्परिणाम

- जास्त व्यायाम केल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाच्या स्नायूंना सूज येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

- दीर्घकाळ अतिव्यायाम केल्याने केवळ स्नायूंना दुखापत होत नाही, तर वेदना आणि सूज देखील येते. तसेच हाडांवर दाब वाढून फ्रॅक्चर होऊ शकते.

- जास्त व्यायामामुळे हार्मोन्सच्या स्रावावर परिणाम होतो. यामुळे मासिक पाळीच्या समस्या, गर्भधारणेत अडथळा आणि लैंगिक इच्छेत घट यांसारख्या समस्या उद्भवतात.

- सतत जास्त व्यायाम केल्याने तणाव आणि नैराश्य येऊ शकते. तसेच, याचा झोपेवरही परिणाम होतो.

- जास्त व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

- अतिव्यायामामुळे अन्ननलिकेत व्रण (ulcer) आणि ॲलर्जी होऊ शकते.

- सततच्या अतिव्यायामामुळे रक्तदाब वाढून चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त व्यायाम केल्याने वर नमूद केलेल्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापुढे व्यायाम करताना काळजी घ्या. तसेच, आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच व्यायाम करा.