- Home
- lifestyle
- Aqua Workout : अॅक्वा वर्कआउट नक्की काय प्रकार आहे? वजन कमी करणे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Aqua Workout : अॅक्वा वर्कआउट नक्की काय प्रकार आहे? वजन कमी करणे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Aqua Workout : अॅक्वा वर्कआउट म्हणजे पाण्यात केला जाणारा कमी-इम्पॅक्ट पण प्रभावी व्यायाम. यामुळे वजन कमी होते, हाडे-सांधे सुरक्षित राहतात, स्नायू मजबूत होतात, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो

अॅक्वा वर्कआउट
अॅक्वा वर्कआउट म्हणजे पाण्यात केला जाणारा संपूर्ण फिटनेस व्यायाम. पाण्याच्या रेसिस्टन्समुळे (Resistance) शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते, मात्र सांध्यांवरचा ताण अत्यंत कमी असतो. त्यामुळे वजन कमी करणे, स्नायू मजबूत करणे आणि लवचिकता वाढवणे यासाठी अॅक्वा वर्कआउट आजकाल लोकप्रिय होत आहे. हे वर्कआउट सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित मानले जाते, विशेषतः ज्यांना सांधेदुखी, पाठीचा त्रास किंवा ऑर्थोपेडिक समस्या आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
अॅक्वा वर्कआउट नक्की काय?
अॅक्वा वर्कआउट म्हणजे स्विमिंग पूलमध्ये केली जाणारी विविध प्रकारची एक्सरसाइज. यात वॉटर एरोबिक्स, वॉटर जॉगिंग, फ्लोटिंगच्या सहाय्याने स्ट्रेचिंग, रेसिस्टन्स बँड्स किंवा वॉटर डम्बेल्स वापरून स्ट्रेंथ ट्रेनिंग अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. पाण्याची घनता जास्त असल्यामुळे प्रत्येक हालचालीसाठी शरीराला अधिक शक्ती वापरावी लागते. त्यामुळे कॅलरी बर्निंग वाढते आणि मसल टोनिंग प्रभावीपणे होते. व्यायामादरम्यान शरीरावरचा धक्का (Impact) कमी असल्यामुळे ही पद्धत सुरक्षित व्यायामशैली मानली जाते.
वजन कमी करण्यास मदत
अॅक्वा वर्कआउट वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. पाण्यात व्यायाम करताना साधारण जमिनीवर करण्यात येणाऱ्या वर्कआउटपेक्षा ३०–५०% अधिक कॅलरीज बर्न होतात. पाण्याच्या प्रतिकारामुळे हृदयगती वाढते आणि शरीराची मेटाबॉलिक अॅक्टिव्हिटी सुधारते. त्यामुळे स्थूलता, थायरॉइड किंवा हार्मोनल समस्येमुळे वजन वाढले असेल तरीही पाण्यातील व्यायामामुळे वजन घटविण्याची प्रक्रिया अधिक सहज होते.
सांधे आणि स्नायू मजबूत होतात
पाणी शरीराचे वजन कमी जाणवायला मदत करते. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांना अॅक्वा वर्कआउट एक सुरक्षित पर्याय ठरतो. जिममध्ये केलेल्या स्ट्रेंथ ट्रेनिंगपेक्षा पाण्यात स्नायूंचा व्यायाम अधिक हळू, संथ आणि नियंत्रणात होतो. रेसिस्टन्समुळे स्नायू मजबूत होतात आणि बॉडी पोश्चर सुधारते. तसेच, पाण्यात स्ट्रेचिंग केल्याने लवचिकता (Flexibility) वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो.
मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम
पाण्यात व्यायाम केल्याने शरीर रिलॅक्स होते, मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होतो. वॉटर वर्कआउटमुळे शरीराला ‘एंडॉरफिन’ नावाचे हॅपी हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. ज्यांना ध्यान किंवा मेडिटेशन करणे अवघड वाटते, त्यांना अॅक्वा वर्कआउट हा एक उत्तम तणावमुक्त करणारा पर्याय ठरतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते
अॅक्वा वॉर्कआउटमध्ये संपूर्ण शरीर एकाचवेळी काम करते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाच्या स्नायूंवर चांगला परिणाम होतो आणि हार्ट रेट कंट्रोलमध्ये राहतो. नियमित पाण्यातील व्यायामामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होऊ शकतो. हे वर्कआउट कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा एकत्रित प्रभाव देते, जे संपूर्ण फिटनेससाठी सर्वोत्तम मानले जाते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

