घामासारखे पाणी सोडत घर थंड ठेवणारा पेंट ही मानव जातीला एक वैज्ञानिक भेट आहे. यामुळे विजेची बचत तर होणार आहेच, पण घरही नैसर्गिंकपणे थंड राहणार आहे.
जर तुमचं घर सुद्धा तुमच्या त्वचेसारखं घाम गाळून थंड राहू लागलं, तर? सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवलंय. नॅनयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी एक विशेष सिमेंट-आधारित पेंट तयार केलं आहे जे मानवी शरीरातील नैसर्गिक थंडावण्याच्या पद्धतीची (sweating) नक्कल करतं. पारंपरिक थंड पेंट्स जिथे पाण्याला दूर ठेवून इमारतीचं संरक्षण करतात, तिथे हे पेंट त्याच्या छिद्रांमध्ये पाणी साठवून हळूहळू वाफेच्या स्वरूपात ते बाहेर सोडतं, ज्यामुळे उष्णता बाहेर निघून जाते.
"ही प्रणाली पूर्णतः पॅसिव्ह आहे," असं साहित्य वैज्ञानिक ली हॉंग सांगतात. म्हणजे यासाठी कोणत्याही वीजेची किंवा यांत्रिक उर्जेची गरज नाही. पारंपरिक पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या radiative cooling मध्ये ओलसर हवामानात मर्यादा येतात कारण हवा उष्णता अडवते. म्हणूनच या संशोधकांनी वेगळी वाट निवडली.
तिहेरी थंडावण्याची शक्ती
या पेंटमध्ये एकाच वेळी तीन प्रकारचे थंडावणारे तंत्र वापरले आहे. सौर प्रकाश परावर्तित करणं (88–92% पर्यंत), उष्णता विकिरण स्वरूपात बाहेर सोडणं (95% पर्यंत), घामासारखी बाष्पीभवनाद्वारे थंडी निर्माण करणं याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, नॅनो-पार्टिकल्स, थोडं पॉलिमर, आणि मीठ वापरलं गेलं आहे, जे ओलावा टिकवायला आणि भेगा पडू नये यासाठी मदत करतात.
२ वर्षांची चाचणी आणि परिणाम
सिंगापूरमध्ये तीन लहान घरांवर दोन वर्षं चाचण्या घेण्यात आल्या. एकावर साधा पांढरा पेंट, दुसऱ्यावर बाजारातला कुलींग पेंट, आणि तिसऱ्यावर नवीन "घाम टाकणारा" पेंट करण्यात आला. सामान्य आणि बाजारातील पेंट उन्हात पिवळसर झाला, पण नवीन पेंट अजूनही स्वच्छ पांढरा होता, असं सहलेखक जिपेंग फेई म्हणाले. उजळ पांढरा पेंट ही दीर्घकालीन शीतता टिकवण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे.
ऊर्जेची बचत आणि हवामान बदलावरील उपाय
या पेंटमुळे एसीच्या वापरात ३०–४०% पर्यंत घट झाली. सहलेखक सी वी कोह म्हणतात की, "इमारतीतील सुमारे ६०% ऊर्जा स्पेस कूलिंगवर जाते." हा पेंट मोठ्या प्रमाणावर वापरल्यास, वीज वापरात मोठी घट आणि थंड वातावरण कायम ठेवता येऊ शकतं, तेही वीज-खाणाऱ्या एसीशिवाय.
शहरे, उष्णता आणि पर्यावरण पूरक उपाय
शहरांमध्ये Urban Heat Island Effect (UHI) खूप तीव्र असतो, जिथे काँक्रीटच्या इमारती उष्णता साठवतात आणि परत वातावरणात सोडतात. एसी हे आणखी गरम हवा बाहेर सोडून समस्या वाढवतात. परंतु हे पेंट उष्णता इन्फ्रारेड विकिरणाच्या रूपात सोडतं, जी थेट वातावरणात मिसळते, स्थानिक तापमान न वाढवता.
"सिंगापूरमध्ये UHI खूप गंभीर आहे," असं कोह म्हणतात. मिडल ईस्टसारख्या भागांनाही याचा मोठा फटका बसतो. हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांसोबत, हे पेंट एक पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक उपाय ठरू शकतो.
