Apple To Overtake Samsung : स्मार्टफोन बाजारात सॅमसंगचे दीर्घकाळापासूनचे वर्चस्व कमी होत असल्याचे काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. आयफोन 17 सीरिज लाँच झाल्यामुळे ॲपलची मोठी झेप.
Apple To Overtake Samsung : जगातील नंबर वन स्मार्टफोन निर्माता म्हणून दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगचे दीर्घकाळापासूनचे वर्चस्व कमी होत असल्याचा अहवाल आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या नवीन अहवालानुसार, 2025 च्या अखेरीस ॲपल जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये सॅमसंगला मागे टाकून पहिले स्थान मिळवू शकते. यामागे आयफोन 17 सीरिजला असलेली विक्रमी मागणी आणि वेगाने वाढणारे अपग्रेड सायकल हे प्रमुख कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच ॲपल फोन विक्रीच्या बाबतीत सॅमसंगला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.

2025 मध्ये ॲपल 24 कोटींहून अधिक आयफोन विकणार
2025 मध्ये ॲपल 243 दशलक्ष (24 कोटी) आयफोन आणि सॅमसंग 235 दशलक्ष (23 कोटी) फोन बाजारात आणेल. ॲपलने सप्टेंबर 2025 मध्ये लाँच केलेली आयफोन 17 सीरिज स्मार्टफोन बाजाराची रचना बदलेल, असे अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, सॅमसंगच्या शिपमेंटमध्ये वार्षिक 4.6 टक्के वाढ होईल आणि जागतिक बाजारातील हिस्सा 18.7 टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तरीही, कंपनीने दशकाहून अधिक काळ टिकवून ठेवलेले पहिले स्थान गमावेल, असे काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात सूचित केले आहे. 2025 मध्ये स्मार्टफोन विक्रीत ॲपलचा वाटा 19.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

लोक जुने आयफोन अपग्रेड करत आहेत
काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, 2025 मध्ये जागतिक स्मार्टफोन विक्रीत 3.3 टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे. वरिष्ठ विश्लेषक यांग वांग म्हणाले की, आयफोन 17 सीरिजसाठी असलेल्या सकारात्मक बाजारासोबतच, लोक जुने फोन अपग्रेड करत आहेत, हे विक्रीच्या नवीन अपेक्षेमागील प्रमुख कारण आहे. कोविड-19 च्या लाटेदरम्यान स्मार्टफोन खरेदी केलेले ग्राहक आता त्यांचे फोन अपग्रेड करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 2023 ते 2025 च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान 358 दशलक्ष सेकंड-हँड आयफोन विकले गेले आणि हे वापरकर्ते येत्या काही वर्षांत नवीन आयफोनमध्ये अपग्रेड करण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. हे घटक एक मोठी मागणी निर्माण करतील आणि यामुळे आगामी तिमाहीत आयफोनच्या शिपमेंटमध्ये वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे, असेही यांग वांग यांनी सांगितले.


